सुदैवाने जिवितहानी टळली
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील तळ मजल्यावर असलेल्या स्वयंपाकगृहातील स्लॅब अचानक कोसळला. त्याठिकाणी काम करीत असलेल्या महिलांचा जीव सुदैवाने वाचला. त्या दोघीही सुखरूप आहेत. मात्र, जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत 40 वर्षे जुनी आहे. या इमारतीचे दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये ही इमारत धोकादायक असून, दुरुस्ती करू शकता, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे करोडो रुपयांचा निधी खर्च करून इमारतीची दुरुस्ती सुरु आहे. मात्र, रुग्णालयाच्या इमारतीमधील स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील तळ मजल्यावर असलेल्या स्वयंपाकगृहाची अवस्था बिकट आहे. बाजूच्या परिसरात गवत वाढले असून, दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे. सांडपाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याचा फटका वारंवार बसत आहे. या स्वयंपाकगृहाच्या भिंतींना तडे गेले असून, ठिकठिकाणी स्लॅब निघू लागले आहे. त्यामुळे येथील कामगार जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. बुधवारी दुपारी येथील महिला व अन्य कामगार स्वयंपाक करण्यामध्ये मग्न होते. त्यावेळी अचानक दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकगृहातील भला मोठा स्लॅब खाली कोसळला. सुदैवाने तेथील कोणालाही इजा झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. कर्मचार्यांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळ सार्वजनिक बांधकाम विभाग खेळत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.