| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नागरपरिषदेमध्ये सुंदर कर्जत.. स्वच्छ कर्जत .. हरित कर्जतसाठी स्वच्छता ही सेवा हा स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने कर्जत शहरात अभिनव ज्ञान मंदिर शालेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले केले. दरम्यान, पथनाट्य अंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कचरा व्यवस्थापन-आरोग्य व स्वच्छता आणि प्लास्टिक टाळा हा स्वछता संदेश सर्वांनी एक नित्यनियम म्हणून आपण अंमलात आणावा, असे आवाहन पालिका प्रशासक आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद, जिल्हा स्वच्छता विभाग, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, स्वच्छता हीच सेवा-2024 अभियानांतर्गत कर्जत नगरपरिषद व अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत नगरपरिषदेच्या भव्य प्रांगणामध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक वैभव गारवे यांच्या माध्यमातून शहरात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे. त्यानिमत्ताने शहरातील अभिनव शालेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील विविध भागात स्वच्छतेचे संदेश देणारे पथनाट्य सादर केली आहे. हे पथनाट्य आज पालिका कार्यालयात सादर झाले. यावेळी मुख्याधिकारी गारवे यांच्यासह पालिका अधिकारी तसेच अभिनव प्रशालेचे मुख्यध्यापक शिंदे, पर्यवेक्षक अनिल गलगले आदी प्रमुख उपस्थित होते. या पथनाट्याच्या संकल्पना आणि हेतू याबद्दल शिक्षक संजय देसले यांनी माहिती दिली.
स्वच्छताविषयक जनजगृती करणारे पथनाट्य अभिनव शालेच्या गाईड विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळेच्या शिक्षिका जयमाला जांभळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने कचरा- व्यवस्थापन पथनाट्य व विद्यार्थी अभिनय, साहित्य जुळवाजुळव, विद्यार्थी ड्रेपरी तसेच स्वच्छता संदेश, प्रतिज्ञा लेखन व स्वच्छता नाटिका यासाठी शिक्षिका वैशाली ढोले, सोनाली चव्हाण आणि अनिल गालगले यांचे मागर्दशन लाभले. शाळेचा विद्यार्थी तेजश्री ढोले आणि इतर विद्यार्थी यांनी गाण्यांना साथ दिली, तर संगीत विभागात आर्यन देशमुख, अथर्व फराट, श्रवण शिर्के व इतर सहाय्यक विद्यार्थी यांचा सहभाग राहिला.
पथनाट्य निर्मितीत आवाजाच्या विशेष शैलीत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी तेजस्विनी ठमकेची महत्त्वपूर्ण भूमिका होती. तर सहाय्यक म्हणून जान्हवी डफळ, युक्ती कुलकर्णी यांचा सहभाग लाभला, तसेच सदरच्या पथनाट्याची विशेष बाब म्हणजे दोन दिव्यांग विद्यार्थिनींनीदेखील सक्रिय सहभाग घेऊन उत्साह वाढवला होता. कचरा व्यवस्थापन पथनाट्य यामध्ये क्षत्रीय मोहित, अनुष्का गायकवाड, सिद्धी गायकवाड, मधुरा पवार, तेजश्री ढोले यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
प्लास्टिक वापराचे भयाण सत्य
प्लास्टिक टाळा-अभिनव पथनाट्य, आज आपल्याला भेडसावत असलेल्या पर्यावरणीय समस्यांपैकी प्लॅस्टिक ही सर्वात गंभीर समस्या बनली आहे. भारतात दरवर्षी सुमारे 3.5 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. महापालिका घनकचरा, ऑटोमोबाईल कचर्यापासून 2025 पर्यंत कचर्याचे प्रमाण 3 पटीने वाढण्याची अपेक्षा आहे. प्लास्टिकचा एक दशांशपेक्षा कमी पुनर्वापर केला जातो. या अनुषंगानेच जनजागृतीपर प्लास्टिक टाळा हे पथनाट्य सादर केले गेले.