नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणाची तयारी सुरु

जिल्हा प्रशासनाचा आढावा सुरु; 211 दरडग्रस्त गावे

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पावसाळ्यात दरडीसारख्या ओढवणार्‍या नैसर्गिक आपत्तींपासून जिल्ह्यातील नागरिकांची संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पूर, चक्रीवादळे, दरडी कोसळणे यावर मात करण्यासाठी आधुनिक यंत्रणा वापरली जाणार असून या उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांमध्ये दरवर्षी वाढ होत असून मागील 15 वर्षात 103 वरुन ही संख्या 211 वर गेली असल्याने येथे विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

मान्सून सुरु होण्यास अद्याप दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असताना दरडप्रवण गावातील उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गीक आपत्तींचा मान्सूनपुर्व आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व अधिकार्‍यांसह स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थित होते. यात विषेशतः दरडी कोसळू नये यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

रायगड जिल्ह्यात दरडीमध्ये मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या अन्य नैसर्गिक आपत्तींपेक्षा सर्वाधिक आहे. यासह दरडी कोसळून रहदारी विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. दरडी कोसळण्यानंतर मदतकार्य राबवण्यापेक्षा आपत्ती येण्यापुर्वी उपाययोजना केल्यास होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासन यावर गांभिर्याने काम करीत असल्याचे म्हणणे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे आहे. दरडग्रस्त गावातील नागरिकांचे निरिक्षण त्यावर तज्ज्ञांनी मांडलेली मते यांचा सखोल अभ्यास करुन यावर उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाचे सुक्ष्म निरिक्षण करता यावेत यासाठी प्रत्येक महसूल मंडळस्तरावर कृषी विभागाकडून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वीत करण्याच्या सूचना (जीएसआय) भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात असे 82 महसूल मंडळ असून यातील फक्त 5 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र सुरु झाली आहेत, उर्वरीत 17 ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नाविण्यपुर्ण योजनांमधून महाड तालुक्यात सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 26 ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात येत आहे. यासाठी 13 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुराचा धोका असलेली गावे
मुरुड
– भोईघर, मांडला, बोर्ली, तळा- वावा, राणेची वाडी, खैराट, बामणघर, अंबेशी; पेण– आंबेघर; अलिबाग– श्रीगाव, सुधागड– नवघर, कोंडगाव, पेडली, घोटवडे, परली, केवळे, उद्धर, उन्हेरे; श्रीवर्धन– बोर्ली पंचतन, गोंडघर, वडवली, कुडकी; म्हसळा– बौध्दवाडी, विठ्ठलवाडी, पाभरेगाव, संदेरी, फळसप; महाड– वरंध, बारसघर, शिरवली, पांगारी, वरंडोली, नांदगाव, वलंग, जुई, सोनघर, खैरे; पनवेल– सावणे, जांभिवली, देवलोली.

दरडींमुळे वाहतुक विस्कळीत होणारी ठिकाणे
कशेडी घाट
– पोलादपूर, कार्लेखिंड– अलिबाग, ताम्हाणी घाट – माणगाव, आंबेनळी घाट– पोलादपूर, अंडा पाँईट– खालापूर, भिसे खिंड, सुकेळी खिंड– रोहा

जीएसआयच्या शिफारशी
दरडप्रवण भागात पर्जन्यमापक यंत्र बसविणे, ज्यामुळे अतिवृष्टीचा अंदाज घेवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे शक्य होईल. दरडग्रस्त गावांमध्ये होणार्‍या बांधकांमाबाबत जनजागृती करणे, विविध जैविक वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देणे, तीव्र उतारावरील गावांमध्ये संरक्षण भिंत बांधणे

सह्याद्रीच्या पट्ट्यात दरडींचे प्रमाण वाढलेले आहे. अशा परिस्थितही दरडींपासून होणारे नुकसान कमी करणे शक्य आहे. दरडी कोसळण्यापुर्वी काही संकेत मिळत असतात. या संकेतांची कल्पना तेथील नागरिकांना सर्वप्रथम येते. यासाठी दरडप्रवण गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे होणारी जीवित, वित्त हानी कमी करता येणे शक्य आहे.

प्रा. डॉ. सतिष ठिगळे, निवृत्त विभागप्रमुख, भूशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ
Exit mobile version