मला गोळी मारली जाईल; भुजबळांचा विधानसभेत दावा


| नागपूर | प्रतिनिधी |
मला गोळी मारली जाईल, असा पोलिसांचा अहवाल असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. बुधवारी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. एकदा आरक्षण मिळू द्या. त्यानंतर भुजबळांचा कार्यक्रम करतो, असे जरांगे पाटील म्हणाल्याचा दावा छगन भुजबळ यांनी सभागृहात केला.

‘माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु झाली आहे. प्रकाश सोळुंखे, संदीप क्षिरसागर यांच्या बाबतमध्ये जे झाले तेच माझ्याबाबतीमध्ये होईल,’ असे भुजबळ म्हणाले. मला मारा हरकत नाही, पण जे काही सुरु आहे. ते बरोबर नाही. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, मात्र त्यांना वेगळे आरक्षण द्या, पण ही झुंडशाही थांबवा, असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ महाराष्ट्राला लागलेला कलंक-जरांगे
छगन भुजबळ महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. अंतरवलीतील लोक घरात कोंडून मारले, तेव्हा ते झोपले होते का, असा घणाघाती हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमात बोलत होते. जरांगे यांनी भुजबळांचा पुन्हा एकेरी भाषेत उल्लेख केला. बीडची दंगल त्यांनीच घडवून आणली आहे. छगन भुजबळ यांना बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, त्यांचे एकूण तुम्ही आमच्या लोकांना अटक केली. भुजबळांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं, तरी तुम्ही त्यांच्यावरील गुन्हे मागे कसे घेता, असा सवालही त्यांनी केला.

Exit mobile version