| महाड | प्रतिनिधी |
मंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. भुजबळ यांच्या पुणे येथील कार्यालयात फोन करून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. धमकी देणाऱ्या इसमास अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण टीमने महाड मधून अटक केली आहे. दारू पिऊन धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. भुजबळांना धमकी दिल्याचे ऑडिओ क्लिप देखील सर्वत्र व्हायरल झाला आहे. धमकी देणाऱ्या इसमाचे नाव प्रशांत पाटील असे असून त्याला महाड नवेनगर येथून अटक करण्यात आली आहे.
प्रशांत पाटील हा मूळ कोल्हापूरचा असून त्याने महाडमधून ही धमकी दिली होती. संबंधित ऑडिओ क्लिप मध्ये मला भुजबळ यांना जिवे मारण्याची सुपारी मिळाली आहे असे आरोपी प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे तसेच आपण सांगून काम करतो असे देखील प्रशांत पाटील यांनी फोनवर सांगितले. सोमवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजताच्या दरम्यान प्रशांत पाटील यांने पुणे येथील भुजबळांच्या ऑफिसमध्ये कॉल केला होता. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी पहाटे साडेचार वाजता महाड नवे नगर येथून प्रशांत पाटील याला ताब्यात घेतले आहे. अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार कराडे, पोलीस शिपाई ओमले, पोलीस शिपाई पिंगळे, पोलीस शिपाई तांदळे यांनी सदर आरोपीला पकडण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. प्रशांत पाटील या आरोपीस पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले असून या घटनेचा पुढील तपास पुणे पोलीस हे करीत आहेत.