पेण अर्बनसाठी पुन्हा संघर्षाची तयारी

ठेवीदारांचे पैसे मिळावेत हीच अपेक्षा; माजी आ. धैर्यशील पाटील यांची ग्वाही
| पेण | प्रतिनिधी |
गेली बारा वर्ष पेण अर्बन बँकेचा लढा लढत असून आजपर्यंत हवे तसे यश आले नाही. परंतु निवडणुका आणि अर्बन बँकेचा लढा याचे कोणी सांगड घालू नये आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोपर्यंत शेवटच्या ठेवीदाराला आपली ठेव परत मिळत नाही तोपर्यंत लढत राहायचे आहे आपला उद्देश एकच असायला पाहिजे ठेवीदारांचे पैसे परत मिळविणे त्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष उभा करावा लागला तरी चालेल,असा निर्धार माजी आम.धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीने एक दिवसाच्या धरणे आंदालनाचे आयोजन पेण नगरपालिकेसमोर केले होते. यावेळी ते बोलत होते.धरणे आंदोलनासाठी ठेवीदार खातेदार ठेवीदारांच्या बरोबरीने आ.प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रविशेठ पाटील, संजय केळकर, जि.प. सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे(हरी ओम) व धरणे आंदोलनाचे आयोजक तथा खातेदार ठेवीदार संघर्ष समितीचे नरेन जाधव आदी उपस्थित होते. ठेवीदारांपैकी गरीकपटी विजयालक्ष्मी मोहपाडा, संदीप मोने, प्रकाश वखरे, दादा झेमसे, श्रीमती भावे अदींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
उपस्थितांसमोर बोलताना धैर्यशील पाटील यांनी सांगीतले की, ज्यावेळेला अर्बन बँकेच्या ठेवीदार खातेदारांना घेउन मुख्य मंत्र्यांच्या निवासस्थानी चालत गेलो. त्यावेळी तत्कालीन निम्म्या मंत्रीमंडळाने सहयाद्री अतिथी गृहावर बँक सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, पुढे हवी तशी प्रगती झाली नाही. मात्र या 12 वर्षाच्या कारकिर्दीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या व नंतर भाजप शिवसेनेच्या सरकारने मोठया प्रमाणात संघर्ष समितीला मदत करण्याची भूमिका मांडली. आणि त्यामुळे काही प्रमाणात लढयाला यश आले,असेही ते म्हणाले.

शिशिर धारकरने बायकोवर पैसे उधळले
यावेळी बोलताना आम.रवी पाटील यांनी 75 वर्षाची जुनी बँक बापाने सांभाळून ठेवली होती. परंतु शिशिर धारकरच्या हातात गेल्याने बँकेला घरघर लागली. आता कोणी विचारायला गेला की, बँक तटकरेनीं बुडविली,अरे खरा बँकेचा खलनायक तु आहेस. पैसा पैसा करुन या पेणमधील 40 माणसे मेली. याची जबाबदारी खर्‍या अर्थाने शिशिर धारकरची आहे. बँकेचे सर्व पैसे बायकोवर फुकट घालवले. तिच्यावर सर्व पैसे उधळले. हे पैसे परत मिळविण्यासाठी उचेडयाच्या बंगल्याला आपण 10 हजार ठेवीदारांचा घेराव घालायचा आहे. त्याला काय विकायचे ते विकु दे परंतु आपले पैसे द्यावेत,अशी मागणीही रवी पाटील यांनी केली.

आज बँकेची मालमत्ता खर्‍या अर्थाने ठेवीदारांची आहे. व ती विकून ठेवीदारांना पैसे मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मोठया संघर्षाची तयारी करणे गरजेचे आहे. सर्वांना एकत्र करुन पुन्हा एकदा सरकारला जागे करणे गरजेचे आहे. जेणेकरुन सरकारकडून योग्य ती हालचाल करुन 12 वर्ष प्रलंबित असलेला निकाल ही निघेल. पण यासाठी एकजुटीची गरज आहे. एकजुटी बरोबर एकच उद्देश डोळ्यासमोर घ्यायचे की, ठेवीदारांचे पैसे परत मिळविणे. – माजी आ. धैर्यशील पाटील

Exit mobile version