चार कर्मचाऱ्यांवर तालुक्याचा भार
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागाची अवस्था सध्या अक्षरशः व्हेंटिलेटरवर गेली असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी आणि पशुपालक संतप्त झाले आहेत. येथील आठ दवाखान्यांपैकी तब्बल चार दवाखाने कर्मचाऱ्यांविना बंद पडले असून, उरलेल्या चार कर्मचाऱ्यांवर संपूर्ण तालुक्याचा भार टाकण्यात आला आहे. परिणामी ग्रामीण आणि दुर्गम भागातील पशुधन अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पेण तालुक्यातील जोहे, कामार्ली, बोरगाव आणि शिहू येथील पशुवैद्यकीय दवाखाने कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. तर गागोदे, पाबळ, गडब आणि पेण येथील दवाखान्यांतील मोजक्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण तालुका सांभाळण्याची जबाबदारी आहे. एखादा कर्मचारी रजेवर गेला की, संपूर्ण यंत्रणा कोलमडते आणि दवाखाने ओस पडतात. त्याचा थेट फटका पशुपालकांना बसत असून, जनावरांना वेळेत उपचार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे पंचायत समिती स्तरावरही दोन महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून रिक्त पदे भरण्याची मागणी होत असतानाही प्रशासनाने केवळ आश्वासनांची खैरात वाटल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, जिल्हा पशुधन विकास अधिकारी तथा उपायुक्त दुग्ध व्यवसाय विकास डॉ. सचिन देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या जून महिन्यात भरती होणार, असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याची भावना पशुपालकांत व्यक्त होत आहे. मात्र, जूनपर्यंत जनावरांचे काय? असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारू लागले आहेत.







