नारळफोडीच्या स्पर्धेतून संस्कृतीची जपणूक: चित्रलेखा पाटील

चिमण्याप्रेमी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

| अलिबाग | प्रतिनिधी |

मोबाईल आणि आधुनिक मनोरंजनाच्या युगात पारंपरिक खेळ लोप पावत असताना नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आजही गावोगावी हे खेळ उत्साहाने जपले जात आहेत. नारळफोडीची स्पर्धा केवळ करमणुकीचे साधन नसून, नव्या पिढीला लोकपरंपरा, संस्कृती आणि सामुदायिक जीवनाशी जोडणारा दुवा आहे, या स्पर्धेतून संस्कृतीची जपणूक होत असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.

नागाव-कोठारभाट येथे ॲड. हर्षल मोरे यांच्या प्रयत्नातून साईभक्त मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक नारळफोडी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ॲड. हर्षल मोरे, माजी सरपंच निखिल मयेकर, डॉ. संतोष मोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका काठे यांच्यासह स्पर्धक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



नारळफोडी हा कोकणच्या ग्रामसंस्कृतीचा आणि नारळी पौर्णिमेच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. पूर्वी नारळाची गुणवत्ता तपासण्यासाठीही अशा प्रकारच्या चाचण्या केल्या जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मनोरंजनासोबतच या स्पर्धेला पारंपरिक आणि सामाजिक महत्त्व असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी नमूद केले.

स्पर्धेत दोनशे संघांनी सहभाग घेतला. चुरशीच्या लढतीत चिमण्याप्रेमी 8383 (अ) संघाने प्रथम क्रमांक पटकावला. समर्थ कोपर (ब) द्वितीय, नवतरुण करावी तृतीय, तर आरजे सुयोग संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला. सर्व विजयी स्पर्धांना ॲड. हर्षल मोरे यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देण्यात आला. अनुक्रमे पाच ते आठ क्रमांकांना भेट वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यात अनुक्रमे पूर्वीत राणे, समर्थ कोपर, क्रिश खोपटकर, सान्वी उदय राऊळ यांचा समावेश आहे.

नारळफोडीची स्पर्धा ही केवळ मनोरंजनाची परंपरा नाही, तर कोकणच्या लोकसंस्कृतीचा ठेवा आहे. आधुनिक युगात अशा पारंपरिक खेळांच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी आणि ग्रामजीवनाशी जोडण्याचे काम होत आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने झाले पाहिजे.

चित्रलेखा पाटील,
प्रवक्ता, शेकाप
Exit mobile version