आधुनिक तंत्रामुळे वणव्यांना प्रतिबंध

| रायगड । प्रतिनिधी ।

वणवे लागून दरवर्षी रायगड जिल्ह्यात लाखो झाडे भस्मसात होतात. अलिबाग वनपट्ट्यांत प्रमाण जास्तच आहे. वणवे विझविण्यासाठी वनविभागाने आधुनिक साधनांचा केलेल्या वापरामुळे अलिबाग कार्यक्षेत्रात येणार्‍या पेण, पनवेल, उरण, खालापूर, सुधागड व रोहा तालुक्यांमध्ये सकारात्मक परिणाम जाणवू लागले आहेत. या तालुक्यांमध्ये वनक्षेत्रफळ अधिक असून त्यावरील अतिक्रमणाचे प्रमाणही मोठे आहे. मात्र जनजागृती, ऑनलाईन मॉनिटरिंगमुळे वणवे लागण्याच्या घटनांमध्ये 35 टक्के घट झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

वणव्यामुळे वनसंपदेचा र्‍हास होतो तसेच, वन्यजीवांचा आश्रयही नष्ट होतो. नैसर्गिक वणवे लागण्याची प्रक्रिया ही जैविक समतोलाचा एक भाग समजली जाते, मात्र अतिक्रमणासाठी तर काही वेळा समाजकंटकांकडून जाणूनबुजून जंगलात आगी लावल्या जातात. काहीजण शिकारीसाठी आगी लावतात, शेतीच्या कामात आग नियंत्रणात राहिली नाही तरीही, वणवा पसरतो. यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत.

अलिबाग वनविभागाचे कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना अद्यापही घडत असल्या तरी त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. वनक्षेत्रालगतच्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत, वनौषधीची लागवड, बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. वनक्षेत्रावर सतत होत असलेले ऑनलाईन मॉनिटरिंगमुळे वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दोन वर्षांत 574 वणवे लागले आहेत, तर एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत अलिबाग वनक्षेत्रात 45 वणव्यांची नोंद झाली आहे.

प्रत्येक वनरक्षकास 500 हेक्टर क्षेत्र
अलिबाग वनक्षेत्रात अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड व रोहा (काही भाग) या तालुक्यांचा समावेश होतो. या विभागात 11 वनपरिक्षेत्र, 62 परिमंडळ व 227 नियतक्षेत्र आहेत. जिल्ह्यात 32 टक्के वनक्षेत्र असून अलिबाग वनविभागाचे निव्वळ क्षेत्र 1074.63 चौरस किलोमीटर इतके आहे. याठिकाणी अलिबाग व पनवेल असे दोन उपविभाग असून दोन गस्ती पथके आहेत. या विभागात एकूण 227 बीट वनरक्षक असून प्रत्येक बीट वनरक्षकावर सरासरी 500 हेक्टर वनक्षेत्र संरक्षणाची जबाबदारी आहे.
आग प्रतिबंधक जाळरेषा
वनक्षेत्राला लागणारी आग ही जमिनीच्या पातळीवर असते. त्याची मोठ्या झाडांना झळ बसली तरी ती नष्ट होत नाही. अलिबाग वनक्षेत्रात खडकाळ, मुरूम, तसेच, कातळाचा परिसर अधिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गवत वाढते अशा ठिकाणी वणव्यास प्रतिबंध करण्याचे दृष्टिने दरवर्षी 15 मीटर, 10 मीटर व 3 मीटर अशा प्रकारच्या आग प्रतिबंधक जाळरेषा केल्या जातात. तसेच, रोपवनांभोवती ऑक्टोबरनंतर आग प्रतिबंधक जाळरेषा घेण्याबाबत सूचना करण्यात येतात. या विभागात फायर वॉच टॉवर्सही उभारण्यात आले आहेत.


वणव्यांवर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी वनविभागातर्फे सतत ऑनलाईन देखरेख केले जाते. वनविभागाच्या संकेत स्थळावर रिअल टाइम वनक्षेत्राचा अहवाल मिळतो. त्यात कुठे वणवा लागला आहे, त्याचे स्वरूप किती, हे संबंधित विभागाला समजते. त्याप्रमाणे संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांना सूचना करून वणवा विझवण्याची तात्काळ कार्यवाही करतात.

राहुल पाटील, वनसंरक्षक, अलिबाग विभाग
Exit mobile version