कडधान्यांच्या उत्पादनात घट; अवकाळीच्या फटक्यामुळे क्षेत्र घटले
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
अवकाळी पावसाचा फटका व घटते क्षेत्र यामुळे कडधान्ये उत्पादनात घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी 150 रुपये किलो मिळणारे गावठी वाल सध्या 250 ते 300 रुपये किलोने मिळत आहेत. मटकी देखील प्रचंड वधारली आहे.
जिल्ह्यात कडधान्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास साडेतीन ते 4 हजार हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मुग, मटकी, चवळी, तूर आदी कडधान्याची लागवड केली जाते. ग्राहकांची गोडे व कडवे वाल, लहान चवळी आणि गावठी व निडीच्या वालांना अधिक पसंती आहे. पावसाळ्यासाठी खेड्या-पाड्यासह शहरातील अनेक जण या कडधान्याची खरेदी करतात. त्यात गावठी कडधान्यांना अधिक पसंती आणि मागणी असते. बाजारात किरकोळ व घाऊक दरात कडधान्य उपलब्ध आहेत. मात्र, यंदा लांबलेला पाऊस तसेच अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कडधान्य पिकांचे खूप नुकसान झाले. परिणामी वालासह इतरही कडधान्य पिकाचे उत्पादन कमी झाल्याने भाव वधारले आहेत. याशिवाय नारू रोगाचा परिणाम देखील उत्पादन घटण्यावर झाला आहे. तसेच, अनेक शेतकऱ्यांनी कडधान्य शेतीकडे पाठ फिरवली असल्याने कडधान्य शेतीचे क्षेत्र देखील घटले आहे. या सर्वांचे एकूणच परिणाम कडधान्य किमती वाढीवर झाला आहे.
निडीच्या वालांना ग्राहकांची मागणी
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या निडी गावचे रुचकर, स्वादिष्ट व मोठ्या वालाच्या शेंगा प्रसिद्ध आहेत. या वालांना ग्रामीण व शहरातील ग्राहकांची अधिक पसंती असते. शिवाय छोट्या गावठी वालांना देखील पसंती देतात. मात्र, सध्या निडीचे वाल उपलब्ध नाहीत.
कडधान्यांचे सध्याचे भाव
वालः 250 ते 300 रु. किलो.
चणाः 100 रु. किलो.
तुरडाळः 100 ते 120 रु. किलो.
मुगडाळः 130 रु. किलो.
पावटाः 160 रु. किलो.
मटकीः 250 रु. किलो.
हिरवा वाटाणाः 100 रु. किलो.
काळा वाटाणाः 100 रु. किलो.
मसुरः 80 रु. किलो.
मसुर डाळः 100 रु. किलो.
मुगः 120 ते 100 रु. किलो.
तुर डाळः 80 रु. किलो.
वालाची डाळः 200 ते 300 रु. किलो.
उडीदः 100 रु. किलो.
चवळीः 120 रु. किलो.
नाचणीः 60 रु. किलो.
वरीः 80 रु. किलो.
सध्या बाजारात ग्राहकांची कडधान्य खरेदीसाठी लगबग सुरु आहे. गावठी कडधान्यांना अधिक मागणी असते. अवकाळी पावसामुळे उत्पादन घाटल्याने यावर्षी कडधान्यांचे भाव मात्र वाढले आहेत. याशिवाय नारू रोगाचा प्रतिकूल परिणाम देखील झाला आहे. शेतकऱ्यांकडे आता मालच शिल्लक राहिला नसल्याने मागणी असूनही पुरवठा करणे अवघड जात आहे.
भद्रेश शहा,
घाऊक व किरकोळ कडधान्य विक्रेते







