। शिर्डी । प्रतिनिधी ।
सत्ता आल्यानंतर अनेक घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केल्या होत्या मात्र, त्यांनी त्या पूर्ण केल्या नाहीत. मोदींची गॅरंटी खोटी आहे हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रसच्या कार्यकर्ता मेळाव्यातील समारोपात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा. यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
एखाद्या धोरणाबाबत मोदी अशी मांडणी करतात की खासदार थक्क होऊन जातात, असेही पवार यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे त्यांनी सांगितले. मात्र, तसे झाले नाही. शहरी भागातील लोकांना घरे देणार होते. परंतु, ते देखील आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. भारताच्या दक्षिणेत आणि इतर राज्यात भाजपची सत्ता नाही. तसेच, देशात भाजपला अनुकूल वातावरणही नाही, असे असतानाही भाजपा 450 जागा जिंकणार असा दावा कोणत्या आधारावर करत आहे, असा सवाल शरद पवार यांनी केला.
जर्मनीत हिटलरची प्रचार यंत्रणा होती, तशी प्रचार यंत्रणा भाजपा राबवत आहे. हिटलरच्या गोबेल्स नीतीची चर्चा होते. त्याचप्रमाणे असत्यावर आधारित अनेक गोष्टी जनमानसात पसरवण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत, असे शरद पवार म्हणाले.