| वाघ्रण | प्रतिनिधी |
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्या मंदिर मानकुळे हायस्कूलचे मुख्याध्यापक रावसाहेब पांडुरंग कटरे यांचा निरोप समारंभ शनिवार, दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान वाघ्रण येथील पत्रकार दिपक यशवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला हायस्कूल व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. मनोज पाटील, प्रदीप म्हात्रे, शुभांगी पाटील, सत्कारमूर्ती रावसाहेब कटरे, पत्नी सुनिता कटरे, दोन मुलगे, निवृत्त मुख्याध्यापक पी.के. पाटील, जी.सी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक अनंत साबळे यांनी केले, तर पी.के. पाटील, जी.सी. पाटील, प्रथमेश कटरे, प्रतिक कटरे, माजी विद्यार्थिनी आदींनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना रावसाहेब यांनी स्वर्गीय अॅड. दत्ता पाटील (दादा) व स्वर्गीय प्रभाकर पाटील (भाऊ) यांचे स्मरण केले. तर संस्था चालक व प्रमुखांबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच शाळा समिती आणि सहकारी सेवक वर्ग व 32 वर्षांच्या कारकीर्दीत आलेले चांगले अनुभव आणि या काळात केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. शेवटी आभार अनिल चौधरी यांनी मानले, तर सूत्रसंचालन अनंत साबळे यांनी केले. या कार्यक्रमात पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







