पुण्यात बनावट नोटांची छपाई; सहा जणांना अटक

बनावट नोटा तयार करण्यासाठी चीनवरुन कागदाची खरेदी

| पुणे | वृत्तसंस्था |

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणात सहा जणांना अटक केले आहे. या टोळीने थेट चीनवरुन ऑनलाईन पद्धतीने अलीबाबा या वेबसाईटच्या आधारे बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद खरेदी करण्यात आला होता. देहू रोड पोलिसांना बनावट नोटा विक्री कऱण्यासाठी एक व्यक्ती मुकाई चौकात येत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून थेट त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर तपास केला असता दिघी परिसरात या बनावट नोटांची छपाई सुरु असल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर पोलिसांनी दिघी परिसरात छापा टाकून रंगेहात सहा जणांना पकडले आणि त्यांना अटक केली. त्यावेळी 440 हूबेहूब 500 च्या नोटा सापडल्या. त्यासोबतच 4484 कटिंग करण्यासाठी तयार असलेल्या नोटा त्यादेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच, प्रिटिंग मशिन, लॅपटॉप, पेपर कटिंग मशिन आणि प्रिटिंग पेपर जप्त केले आहेत. यात ह्रतिक खडसे (22), सुरज यादव (41), अकाश दंगेकर (22), सुयोग साळूंके (32), तेजस बल्लाल (19) आणि प्रणव गव्हाणे (30) यांचा समावेश आहे. या सहा आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version