महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्तीबाबत कार्यशाळा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महिला सुरक्षिततेचा प्रश्न अतिशय गंभीर असून, समाजाने सजग असले पाहिजे. स्वतःच्या संरक्षणासाठी महिलांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. शासकीय उपाययोजना असतातच; परंतु या उपायोजनांच्या सोबत आपण स्वतःची सुरक्षितता प्राधान्य मानून सामाजिक जीवन जगले पाहिजे. समाज माध्यमांचा वापर करताना भान ठेवून, आपण फसवले जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन माजी आ. पंडित पाटील यांनी केले.
महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती याबाबत पेझारी येथील कार्यशाळा पेझारी येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालय पेझारी येथे महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंडित पाटील बोलत होते.
महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्यावतीने महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश हा प्रामुख्याने महिलांना सक्षम करणे आणि विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीची माहिती देणे हा होता. त्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सवाई पाटील यांच्यासह रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागातील अॅड. गीता म्हात्रे, पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी शैलेश कोंडसकर यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महिलाविषयक कायदे, महिला सुरक्षिततेबाबत उपायोजना अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा.डॉ. संगीता चित्रकोटी यांनी प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप पाटील यांनी, तर आभार प्रा. महेश बिर्हाडे यांनी व्यक्त केले.