सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभा घेऊन जनजागृती; बँक ऑफ इंडिया रायगड विभागाचा स्तुत्य उपक्रमाला प्रतिसाद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे अनेकांची आर्थिक लूट होत आहे. ही रोखण्यासाठी बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. ग्राहकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 40 हून अधिक ठिकाणी ग्रामसभा तसेच बँकेच्या कार्यालयात बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. बँकेच्या स्तुत्य उपक्रमाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
कॅशलेस आर्थिक व्यवहारावर अधिक भर दिला जात आहे. 80 टक्क्यांहून अधिक ग्राहक कॅशलेस व्यवहार करतात. त्यामुळे रोखीत व्यवहार कमी होऊ लागले आहेत. परंतु ऑनलाईनच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनेकांची आर्थिक फसवणूक होण्याची भीतीदेखील प्रचंड होऊ लागला आहे. बँकेतून बोलतो असे सांगून आर्थिक लूट करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. कमी व्याजदरामध्ये कर्ज देणे, एटीएम ब्लॉक झाले आहे. पैसे भरावे लागणार असे सांगून अनेकांची फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून आर्थिक फसवूक होत असल्याचे चित्र आहे. बँकेच्या नावाने होणारी ही आर्थिक लूट रोखण्यासाठी बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे.
एकात्मतेच्या संस्कृतीद्वारे राष्ट्राची समृद्धी या हा उद्देश समोर ठेवून बँक ऑफ इंडियामार्फत 15 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जागरूकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात बँक ऑफ इंडियाच्या 43 शाखा आहेत. या शाखांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी (दि. 20) सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभा घेतली. झोनल मॅनेजर मुकेश कुमार व डेप्युटी झोनल मॅनेजर बिरेन चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनानुसार बँक ऑफ इंडिया रायगड झोनतर्फे विविध ग्रामीण व निमशहरी शाखांमध्ये विविध शाखांच्या शाखा व्यवस्थापकांनी ग्रामसभा आयोजित केल्या होत्या. ज्यामध्ये ग्राहकांना फसवणुकीशी संबंधित माहिती देऊन जागरूक करण्यात आले. या बैठकीत ग्राहकांना ओटीपी शेअर करू नका, एटीएम पिन आणि सायबरलिंक शेअर करू नका. जास्त व्याज असणारे कर्ज घेऊन कर्जाच्या विळख्यात अडकू नका असे सांगण्यात आले. तसेच ग्राहकांना कसेे फसवले याची माहितीदेखील देण्यात आली.