मुख्यमंत्रीपदी तिसरी महिला
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी शनिवारी (दि.21) दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर त्या दिल्लीच्या तिसर्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. मुख्यमंत्री आतिशी यांच्यासोबत मुकेश अहलावत, इम्रान हुसेन, गोपाल राय, सौरभ भारद्वाज आणि कैलाश गहलोत या आप नेत्यांनीदेखील मंत्री पदाची शपथ घेतली.
दिल्लीतील राज निवास येथे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं आतिशी मार्लेना यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांची भेट घेत, सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यांच्या नावाला विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही मंजुरी मिळाली. यानंतर आतिशी यांनी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याप्रसंगी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यासह आप नेत्या आतिशींचे आई-वडील तृप्ता वाही आणि विजय सिंह हेदेखील उपस्थित होते.