। अलिबाग । प्रतिनिधी ।
दहा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर साखर चौथच्या गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर ही उत्कंठा संपली. जिल्ह्यामध्ये शनिवारी (दि.21) साखर चौथच्या 879 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात 491 घरगुती व 388 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत गणेशमूर्ती विराजमान करण्यात आली. मिरवणूक काढत बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मूर्तीकार मूर्ती तयार करण्यामध्ये मग्न असल्याने गणेशोत्सवामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करता येत नाही. त्यामुळे दहा दिवसांच्या बाप्पाच्या निरोपानंतर साखर चौथच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, असे काही मंडळींकडून सांगण्यात आले आहे. ही परंपरा आजही कायम आहे. यावर्षीदेखील साखर चौथच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवारी सकाळपासून बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु होती. काहींनी मिरवणूक काढत वाजत गाजत बाप्पाचे स्वागत केले. तर, काहींनी पारंपरिक पद्धतीने डोक्यावर आणत बाप्पाचे स्वागत केले. एक वेगळा उत्साह आबालवृद्धांमध्ये दिसून आला. ‘गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष सर्वत्र दिसून आला. दुपारपर्यंत विधीवत पूजा झाल्यावर मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर बाप्पाच्या आवडीचे मोदक नैवेद दाखण्यात आले. संध्याकाळी काही ठिकाणी संगीत खुर्ची, बाल्या नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. रविवारी सायंकाळी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. तलाव, समुद्र, नदीमध्ये गणरायाचे विसर्जन होणार आहे.