15 ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटकांचे आवडीचे ठिकाण असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटक प्रवाशांना नेणारी नेरळ- माथेरान-नेरळ अशी मिनीट्रेन सेवा 15 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेत येत आहे. यावर्षी 7 जूनपासूनच माथरोनची राणी पावसाळी सुट्टीवर गेली होती. मात्र, मिनीट्रेनची माथेरान ते अमन लॉज प्रवासी सेवा पावसाळ्यातदेखील कायम सुरु होती. दरम्यान, 2025 मध्ये पावसाळ्यातदेखील मिनीट्रेनची सेवा सुरु ठेवण्यावर मध्य रेल्वे प्रशासनांकडून नियोजन सुरु असून, आगामी काळात वर्षाच्या बाराही महिने मिनीट्रेन नेरळ-माथेरान मार्गावर चालविली जाण्याची शक्यता मध्य रेल्वेकडून सुरु असलेल्या कामांमुळे निर्माण झाली आहे.
माथेरानचे डोंगरातील माती पावसाळ्यात कोसळून खाली असते. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठे असून, 21 किलोमीटर अंतर पार करीत माथेरान डोंगरातून जाणारी नेरळ-माथेरान-नेरळ अशी मिनीट्रेन सेवा बंद केली जाते. ब्रिटिश काळापासून पावसाळ्यात 15 जूननंतर 15 ऑक्टोबरपर्यंत मिनीट्रेनची नेरळ- माथेरान-नेरळ अशी सेवा बंद असते. पावसाळ्यात माथेरान या ठिकाणी येणार्या पर्यटकांची संख्या हजारोंमध्ये आहे. त्यामुळे पावसाळ्यात मिनीट्रेनची माथेरान-अमन लॉज शटल सेवेलादेखील पर्यटक प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. ते लक्षात घेऊन पावसाळ्यात माथेरान डोंगरात कोसळणारे पाणी मिनीट्रेनचे नॅरोगेज मार्गाला कोणताही धोका न पोहोचवता खाली दरीमध्ये कसे जाईल यासाठी गेली दोन वर्षे मध्य रेल्वेकडून नियोजन केले जात आहे. त्याच माध्यमातून मिनीट्रेनच्या मार्गावर नॅरोगेज ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाणारी गटारे तयार करण्यात आली आहेत. सिमेंटची गात्रे बांधली गेल्याने पाणी सरळ वाहत जाऊन थेट दरीपर्यंत जात आहे. तर, डोंगरात अनेक ठिकाणी मोठे धबधबे असून, त्या ठिकाण एकावेळी भरपूर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास नॅरोगेज मार्गाला धोका निर्माण झाला आहे. ते लक्षात घेऊन मध्यरेल्वे कडून पाणी वाहून नेण्यासाठी टाकण्यात आलेले लहान पाईप काढून टाकण्यात आले असून, तेथे आता सिमेंट पूल बांधले आहेत. त्यामुळे यावर्षी कुठेही भरपूर पाऊस होऊनदेखील नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर कुठेही नॅरोगेज मार्ग वाहून गेलेला नाही.
हे सर्व काम सुमारे 5 कोटी रुपये खर्चून करण्यात येणार असून, निविदांद्वारे कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. रुळांवर साचलेली माती काढण्यासाठी अभियंते सध्या जेसीबी मशीन वापरत आहेत. गेल्या काही वर्षांत मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी भिंतींना कुंपण घालणे, लाकडी स्लीपरच्या जागी काँक्रिट टाकणे आणि ट्रॅक मजबूत करणे यासह विविध कामे केली आहेत. या पावसाळ्याच्या सुरुवातीला, मध्य रेल्वेने सुरक्षेच्या कारणास्तव नेरळ-अमन लॉज सेक्शनवरील प्रवासी सेवा 8 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत स्थगित केली होती. मात्र, पुढील वर्षांपासून बाराही महिने मिनीट्रेन सुरु ठेवण्यावर मध्य रेल्वेकडून विचार सुरु आहेत. डोंगरातील पाणी वाहून नेण्यासाठी असे 19 पूल ओळखले जात आहेत, तेथे सिमेंट काँक्रिटच्या बॉक्सने छोटे पाईप्स बदलले गेले आहेत, तर नॅरोगेज मार्गावर दरीकडील बाजूस यापूर्वीच अँटी क्रॅश बॅरिअर्स बसवण्यात आले आहेत.
माथेरान वस्तीची गाडी सुरु करावी
नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावर मागील पर्यटन हंगामात दररोज केवळ दोनच गाड्या चालविल्या जात होत्या. नेरळ येथून सकाळी आठ वाजून 50 मिनिटे आणि दहा वाजून 25 मिनिटे या वेळेत दोन गाड्या चालविल्या जात आहेत. या दोन्ही गाड्यांशिवाय माथेरान येथे जाण्यासाठी नेरळ येथून सायंकाळी पाच वाजता गाडी सोडली जायची. ती माथेरान वस्तीची समजली जाणारी गाडी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी ही गाडी बंद केल्यापासून 2006 पासून केली जात आहे. सदर गाडी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी माथेरानमधील व्यापारी आणि माथेरान नागरी पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक गिरीश पवार यांनी माथेरान व्यापारी फेडरेशनकडून केली आहे.