| पुणे | प्रतिनिधी |
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी राज्य सरकारला नोटीस पाठवणार आहेत. तसे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. मुंबई-पुणे, कल्याण-नगरच्या दुरवस्थेवरुन गडकरींनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तीन महिन्यांत रस्ते दुरुस्त करा, अन्यथा ते रस्ते ताब्यात घेतो, असा अल्टिमेटम गडकरींनी दिला आहे. रस्ते राज्य सरकारच्या ताब्यात आहेत. पण शिव्या मला पडतात, असं गडकरी पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
जुना मुंबई-पुणे महामार्गा आणि कल्याण नगर रस्त्याप्रकरणी नोटीस पाठवण्याचे आदेश नितीन गडकरींनी दिले आहेत. रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर करार रद्द करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. ‘मी आताच सांगितलंय की महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या. तीन महिन्यांच्या आत या रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे. मुंबई-पुणे रोड आणि नगरच्या पुढील दोन टोल महाराष्ट्र सरकार घेतं. पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे सांगितलंय आजच नोटीस पाठवा. हे रस्ते ताबडतोड दुरुस्त करा. नाही तर दोन्ही रस्ते ताब्यात घ्या आणि रस्त्यांची काम करा,’ असं गडकरींनी जाहीर भाषणात म्हटलं.