| नेरळ | वार्ताहर |
नेरळ येथील हिट अँड रन प्रकरणी आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, अन्य दोन विद्यार्थी गंभीर आहेत. याप्रकरणी संबंधित रस्त्याची जबाबदारी असलेले विभाग आणि गाडीचे चालक यांना जबाबदार धरण्यात यावे, या मागणीसाठी आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.
नेरळ येथे रस्त्याच्या कडेने दररोज जाणार्या विद्यार्थ्यांना अरुंद रस्त्यांमुळे अपघात झाला. त्यात गाडीने विद्यार्थ्यांना उडविले. त्याआधी कर्जत-कल्याण रस्त्याने प्रवास करताना जेनी ट्युलिप शाळेसमोर असलेल्या गतिरोधकावर गाडीचा वेग कमी नव्हता, अशी माहिती घटना पाहणारे सांगत आहेत. तर, अपघातस्थळ आणि गतिरोधक हे अंतर 50 मीटरदेखील नव्हते आणि त्यामुळे गतिरोधकांवर गाडीचा वेग कमी झाला असता तर पुढे मोहाची वाडी वळणावर अपघात झालाच नसता. दुसरीकडे मोहाची वाडी येथून मोठ्या प्रमाणावर वाहने मुख्य रस्त्यावर येत असतात, तेथे गतिरोधक आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने गतिरोधक टाकले नाहीत आणि झेब्रा क्रॉसिंग पट्टेदेखील मारले नाहीत. त्यामुळे सकाळी वाहनाची वर्दळ नसताना हा अपघात झाला आणि एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या अपघातास जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच रस्त्याचा ठेकेदार आणि चालक यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आदिवासी संघटना यांच्यावतीने संघटनेचे पदाधिकारी सुनील पारधी यांनी केली आहे.
हिट अँड रनने एकाचा बळी आणि दोघांना गंभीर जखमी करणारे इर्टिका गाडी ही कोकणातून रात्रभर प्रवास करून आली होती. कुडाळ ते बदलापूर अंबरनाथ असा प्रवास केल्याने चालकाच्या डोळ्यावर झोप असावी, अशी मोठी शक्यता वर्तवली जात असून, त्याबद्दल अधिक माहिती नेरळ पोलीस घेत आहेत. संबंधित वाहन अंबरनाथ बी केबिन भागातील असून, चालक नशेत होता काय? याचा शोध पोलीस घेत आहेत. नेरळ गावातील अरुंद आणि खड्डेमय रस्त्यामुळे तसेच रस्त्यात आलेली दुकाने यामुळे रस्ता अरुंद बनला असून, त्यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.