। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आघाडीवर आहे. रायगड जिल्ह्यातील संस्थेचे युनिट सामाजिक प्रश्न सोडविण्यात आघाडीवर असून, जनतेने आपल्या समस्या संस्थेकडे मांडाव्यात, असे आवाहन मानवाधिकार आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अफसर कुरेशी यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार रायगड जिल्हा आढावा बैठक कर्जत येथील ब्राह्मण सभा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अफसर कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीला राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रुतिका कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष किशोर जाधव आणि रायगड जिल्हा महिला अध्यक्षा शुभांगी सोनवणे यांची उपस्थिती होती.
मानव अधिकार या संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष सुनील सोनवणे, महिला अध्यक्षा योगिता वैभव डागा यांच्यासह रायगड जिल्हा उपाध्यक्ष गौतम उघाडे, मनोज गायकवाड, रवींद्र कुंभार, विजय जाधव, सतीश देशपांडे, राजश्री डगे यांनी आढावा बैठकीत सहभागी होत अनेक विषय मांडले. यावेळी कुरेशी यांनी रायगड जिल्ह्यात चांगले काम सुरू असून, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था ही सर्वसाठी आधार बनली पाहिजे, असे सूचित केले.त्याप्रमाणे जनतेचे प्रश्न आपल्याकडे आल्यानंतर ते सोडविण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी तात्काळ लक्ष द्यावे, असे आवाहन शेवटी केले.