बलात्काराच्या आरोपाखाली होता अटकेत
कारागृह कोव्हीड सेंटर मधून केले पलायन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने तात्पुरत्या उभारलेल्या कोविड कारागृहातून पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वा दोन च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे सकाळपासून एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला उपचारासाठी कैद्यांसाठी कोव्हिड केअर सेंटर असलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथून त्याने पलायन केल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील सुमारे 68 कैद्यांना कोरोनाची नुकतीच लागण झाल्याची घटना घडली होती. जिल्हा कारागृहात कैद्यांची संख्या जास्त असल्याने यातील काही कैद्यांना नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या इमारतीत तात्पुरते कारागृह निगराणी कक्ष तयार करुन ठेवण्यात आले होते. या कैद्यांमध्ये पोलादपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेला नाईकू उर्फ देवा मारुती दगडे हाही आरोपी होता. त्यास 16 जानेवारी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती व 19 जानेवारी 2018 पासून देवा दगडे हा जिल्हा कारागृहात दाखल होता.
20 जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कैद्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेल्या नेहुली येथील कोविड आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून दगडे याने पलायन केले. या आरोपीचे शिक्षण बारावी पर्यंत झालेले आहे. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या देवा दगडे याची उंची 165 सेंमी आहे. याबाबत कोणासही माहिती मिळाल्यास अलिबाग पोलीस ठाण्याला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.