| पनवेल | वार्ताहर |
एका शाळेच्या विद्यार्थ्याची त्या शाळेच्या चेअरमनपदी निवड केली जाते यापेक्षा दुसरे भाग्य काय असणार आहे. या खुर्चीला गालबोट लागेल किंवा चुकीचे काम होईल असे कोणतेही काम माझ्या हातून होणार नाही हे शपथेवर सांगतो. कष्ट करणारा माणूस हा कधीही हारत नाही आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझे वडील जे.एम. म्हात्रे. मी त्यांच्यात देव पाहिला आहे, असे उद्गार प्रीतम म्हात्रे यांनी चेअरमनपदाचा स्वीकार करताना काढले.
को.ए.सो. इंदुबाई अ. वाजेकर आणि के.वी. कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रीतम म्हात्रे यांची निवड झाली. त्यावेळी ते के.वी. कन्या महाविद्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या शाळेचा विद्यार्थी म्हणून मी मोठा झालो, त्या शाळेच्या चेअरमनपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्यामुळे मी भारावून गेलो आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पेलताना शाळेची उत्तमोत्तम प्रगती करण्यावर माझा भर असेल.
यावेळी मा. आमदार बाळाराम पाटील यांनी प्रस्तावना करताना सांगितले, के वी कन्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा एवढा उत्तम आहे की येथे एकापेक्षा एक शाळा आल्या, पण या शाळेला कधीही ग्रहण लागले नाही. उलट, प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचत आम्हाला प्रत्येक वर्षी प्रवेश बंदचे फलक लावावे लागले. या शाळेने उत्तमोत्तम प्रगती करत उच्च दर्जाचे विद्यार्थी घडविले आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचे शाळा समिती सदस्य म्हणून केलेले काम आणि त्यांचा शिक्षण क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव पाहता या विद्यालयाच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्त करण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या हातून शाळेची उत्तमोत्तम प्रगती होईल अशी आशा व्यक्त करतो.
यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती नारायण घरत, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व शेकपचे विधानसभा संघटक काशिनाथ पाटील, ममता म्हात्रे, मा. नगरसेविका प्रिती जॉर्ज, उपनगराध्यक्ष गणेश पाटील, विश्वास म्हात्रे, माधुरी गोसावी यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, विद्यार्थी व कुटुंब व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
