खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी मोजली मोठी किंमत
| नवी दिल्ली। वृत्तसंस्था ।
प्रो कबड्डीच्या 11 व्या हंगामाचा लिलाव ऑगस्टमध्ये मुंबईत पार पडला. या लिलावात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी मोठी किंमत मोजल्याचे दिसले. एकूण आठ खेळाडूंना एक कोटीहून जास्त रक्कम मिळाली. हा प्रो कबड्डीच्या लिलावातील एक नवा विक्रमही ठरला. आता यंदाच्या हंगामाच्या तारखा आणि ठिकाणांबद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा मोसम 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
हैदराबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे ही तीन ठिकाणे यंदाच्या हंगामातील सामन्यांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. स्पर्धेची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथील गछीबोवली इनडोअर स्टेडियममधून होईल. त्यानंतर 10 नोव्हेंरपासून दुसरा टप्पा नोएडा येथील इंडोर स्टेडियम येथे तर तिसरा टप्पा 3 डिसेंबरपासून पुण्यातील बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम येथे होणार आहे. म्हणजे एका ठिकाणी 23 दिवस सामने रंगणार आहेत. गत मोसमापर्यंत सर्व संघ आपापल्या शहरात सामने खेळत होते. मात्र, यंदा तीनच शहरांत स्पर्धा खेळवली जाणार आहे.
तथापी प्लेऑफच्या तारखा आणि ठिकाण नंतर जाहीर करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. 11 व्या हंगामाच्या तारखांची घोषणा करताना प्रो कबड्डी लीगचे संचालक अनुपम गोस्वामी यांनी आशा व्यक्त केली की 10 वा हंगाम यशस्वी पूर्ण केल्यानंतर आता नवा 11 वा हंगाम त्याहून अधिक लोकप्रिय होईल. यामुळे भारत आणि जगभरातील कबड्डीच्या वाढीला बळकटी मिळेल. अनेक हंगामांप्रमाणे 11 व्या हंगामातील सामन्यांचेही थेट प्रशिक्षप स्टार स्पोर्ट्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. त्यामुळे कबड्डी प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
प्रो कबड्डीचे आत्तापर्यंतचे विजेते
पहिला हंगाम - जयपूर पिंक पँथर्स
दुसरा हंगाम - यु मुम्बा
तिसरा हंगाम - पटना पायरेट्स
चौथा हंगाम - पटना पायरेट्स
पाचवा हंगाम - पटना पायरेट्स
सहावा हंगाम - बेंगळुरू बुल्स
सातवा हंगाम - बेंगाल वॉरियर्स
आठवा हंगाम - दबंग दिल्ली केसी
नववा हंगाम - जयपूर पिंक पँथर्स
दहावा हंगाम - पुणेरी पलटण