माजी कबड्डी खेळाडूंना आवाहन; क्रीडा क्षेत्राचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने खेळाडू आयोग स्थापनेच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या खेळाडू आयोगाचा मुख्य उद्देश असोसिएशनच्या प्रशासनात खेळाडूचे प्रभावी व अर्थपूर्ण प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे, खेळाडू कल्याणाला प्राधान्य देणे. तसेच, पारदर्शकता उत्तरदायित्व, प्रामाणिकता आणि सुशासनाची तत्त्वे अधिक बळकट करणे हा आहे. या आयोगाची स्थापना झाल्यानंतर असोसिएशनच्या प्रशासनामध्ये खेळाडूंना स्वतःचे हित अधिकार व कल्याण यांचे प्रभावी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. खेळ प्रशासनामध्ये खेळाडूचा सक्रिय सहभाग वाढविणे व देशातील क्रीडा क्षेत्राचा दर्जा वाढवणे हा राष्ट्रीय क्रीडा अधिनियम 2025 चा मुख्य उद्देश आहे.
अच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे मार्गदर्शक तत्त्वे व राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 मधील तरतुदी प्रमाणे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अंतर्गत क्रीडा आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे, तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार प्राप्त किंवा राष्ट्रीय स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडूंना या क्रीडा आयोगात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. संबंधित खेळाडू हा किमान एक वर्ष अगोदर खेळातून निवृत्त झालेला असावा व खेळाडूचे वय 25 वर्षा पेक्षा जास्त व 70 वर्षांपेक्षा कमी असावे, ही अट अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी 10 ऑगस्टपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरून राज्य संघटनेच्या अधिकृत ईमेलवर अपलोड करून, संघटनेच शिवाजी पार्क-दादर येथील मध्यवर्ती कार्यालयात दाखल करावेत. प्राप्त अर्जाची छाननी करून, पात्र खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुरुष व महिला यांना समान संधी राहणार आहे. पात्र ठरलेले खेळाडू महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिकृत सभासद होतील व त्यांना या सभेचे सर्व अधिकार प्राप्त होतील.
या योजनेचा राज्यातील जास्तीत जास्त अतिउच्च कामगिरी करणाऱ्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेऊन असोसिएशनचे प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवहान राज्य कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तिकर व प्रभारी सरकार्यवाह माधव गायकवाड यांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच, अधिक माहितीसाठी संघटनेच्या संकेतस्थळाला खेळाडूंनी भेट द्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
