कोंबडीच्या विष्टेपासून सेंद्रीय खताची निर्मिती

हेमंत कोंडीलकर यांचा यशस्वी उपक्रम

| नेरळ | वार्ताहर |

शेतीला पुरक म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे पाहिले जाते. या पोल्ट्री व्यवसायातील एक युवक हेमंत कोंडिलकर यांने कोंबडीच्या विष्टेपासून सेंद्रीय खत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. केवळ विष्ठेची दुर्गंधी मिटवली नाही तर त्यापासून शेतीला उत्तम मात्रा ठरणारे सेंद्रिय असे कोंबडीखत देखील तयार केले. हेमंतच्या या कार्याची दखल शासनाच्या पशु संवर्धन विभागापासून सर्वानीच घेतली आहे. तर आदर्श शेतकरी म्हणून त्याचा गौरव देखील करण्यात आला आहे.


नेरळ आणि कर्जतच्या मध्यावर रेल्वेपट्यात बार्डी हे छोटेसे गाव वसलेले आहे. या गावातील हेमंत नामदेव कोंडीलकर हा तरुण आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करून एका बिल्डरकडे नोकरी करत होता. मात्र लहानपणापासून शेतीचा ओढा असल्याने त्याचे पण काही रमले नाही. त्यामुळे शेतीकडे तो वळला. भाजीपाला लागवड करताना विषमुक्त अन्न निर्माण करण्याची गरज आहे हे त्याने हेरले. मात्र स्वतः हे अंमलात आणताना सेंद्रिय खतांची मात्रा आवश्यक होती. पण त्यातही कमी खर्चात सेंद्रिय खते शेतकर्‍यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे शेतीला जोड म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. पोल्ट्री व्यवसाय वाढतोही आहे. पण कोंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी मोठी असते. ती साफ करणे हे मोठे आव्हान त्या मालकासमोर असते. हि बाब हेमंतच्या लक्षात आली. यापासून सेंद्रिय खत निर्मिती होऊ शकते यासाठी प्रयत्न करायचे हेमंतने ठरवले. कोंबड्यांच्या विष्ठेत असणार्‍या नञाच्या अधिक प्रमाणामुळे शेतीचे नुकसान होते व ते न कुजलेले असल्याने जमिनीत हुमणीची समस्या होत होती. त्यावर उपाय शोधत त्यांने पंचगव्यापासून बनवलेले कल्चर पोल्ट्रीतील तुसावर विशिष्ट प्रमाणित फवारणी केली. तेव्हा पोल्ट्रीतील दुर्गंधी कमी झाली. तसेच उत्तम प्रकारचे व कमी खर्चातले खत तयार झाले.

हे कोंबडीखत शेती, भाजीपाला, फळझाडांवर वापरले असता चांगले परिणाम समोर आले. भाज्यांमधील तजेलदारपणा, टवटवीटपणा, चव उत्तमरीत्या असल्याचे वापरकर्त्यांची सांगितले. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी कमी खर्चात सेंद्रिय बनविता आल.

हेमंत कोंडीलकर, प्रयोगशील शेतकरी

विविध पुरस्कार प्राप्त
यानंतर आतापर्यत 200 पेक्षा अधिक पोल्ट्री फार्ममध्ये यशस्वी प्रयोग हेमंतने केले आहेत. शेतीमध्ये नवीन काहीतरी करून दाखवले असल्याने त्याच्या या कार्याची दखल घेऊन जिजाऊ बहुउद्येशिय सामाजिक संस्था नागपठान औंरंगाबाद या संस्थेकडुन छञपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2022, दि.बा महोत्सव 2021 भूमीपूत्र सन्मान हा मानाचा पुरस्कार ,रायगड प्रेस क्लब व कर्जत तालुका प्रेस क्लब यांच्या सयुक्त विद्यमाने आदर्श शेतकरी पुरस्कार 2022, सेलेबस अँड ग्रोसिबस या संस्थेचा महाराष्ट्र रत्न 2023, महाराष्ट्र माझा 24 तास या वृत्तवाहिनी कडून आदर्श शेतकरी पुरस्कार 2023 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर पशुसंवर्धन विभागाने देखील हेमंतच्या या कार्याची दखल घेतली असून त्यांनी देखील या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.

Exit mobile version