। नेरळ । वार्ताहर ।
अलिबाग येथील गुणकारी औषधी अलिबागचे ओळख सांगणारा पांढरा कांदा यांची शेती नेरळ जवळील कुंभे येथे केली आहे. अर्धा एकर जमिनीवर केलेली ही शेती भलतीच यशस्वी ठरली आहे. अंकुश शेळके या प्रगत शेतकऱ्याने पांढरा कांदा पिकविला असून तब्बल दोन हजार किलो कांदाचे उत्पादन झाले असून या शेतीबद्दल शेळके यांचे कौतुक होत आहे.
अलिबागचा पांढरा कांदा विशेष गुणकारी म्हणून प्रसिद्ध असून अलिबाग तालुक्यातील या कांद्याला विशेष मागणी असते. या कांद्याची शेती ही शक्यतो अलिबाग येथील खाऱ्या वाऱ्याच्या सहवासात अधिक बहरते असे साधारण बोलले जाते. परंतु नेरळ जवळील कुंभे येथील शेतकरी अंकुश गणपत शेळके यांनी लागवड केली आहे. कर्जत तालुक्यातील पांढऱ्या कांद्याचा हा पहिलाच प्रयोग असून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन दिले जात होते. अंकुश गणपत शेळके यांची उल्हास नदीच्या तीरावर कूंभे येथे शेत जमीन आहे. त्याचवेळी अन्य काळात वेगवेगळी नगदी पिके घेणारे हे शेतकरी हिवाळ्यात कडधान्य तसेच पावसाळी भाताची शेती देखील करणारे शेळके यांनी अलिबाग येथील पांढरा कांद्याची शेती करण्याचा निर्णय घेतला.
अंकुश शेळके यांनी त्यासाठी अलिबाग येथील पांढरा कांद्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात भाताची शेती करून झाल्यावर वाफ्यांवर कांद्याची लागवड केली. अलिबाग जवळील चौंढी येथील प्रगत शेतकरी रमेश चिंबुलकर यांच्याकडून बियाणे आणण्यात आले. त्या बियाणांची लागवड २२ डिसेंबर २०२२ रोजी लागवड झालेला कांदा शेतीसाठी अडीच महिन्यांनी त्यांच्या शेतात कांद्याची शेती फुलली आणि चांगले उत्पादन देणारे पीक बहरले आहे.
अवेळी आलेला पाऊस लक्षात घेवून शेतात बहरलेले कांद्याचे हातात आलेले पीक खराब होऊ नये यासाठी कृषी विभागाचे सल्ल्याने शेतातील कांद्याचे उत्पादन काढण्यास सुरुवात केली. अर्ध्या एकर म्हणजे २० गुंठे जमिनीमध्ये काढलेला पांढरा कांदा यांचे उत्पादन हे विक्रमी असेच झाले आहे. त्यात अर्धा किलो क्षेत्रात तब्बल २००० किलो कांद्याचे उत्पादन मिळाले आहे. हा सर्व कांदा प्रगत शेतकरी शेळके यांनी कृषी विभागाचे अधिकारी यांचा योग्य सल्ला घेवून हा कांदा शेतातून बाहेर काढला आहे. हा कांदा आता कोणत्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आणि आपल्याला खरेदी करता येणार याची चौकशी केली जात आहे.