निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई- जिल्हाधिकारी जावळे

। रायगड । खास प्रतिनिधी ।

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करून कोरडा दिवस जाहिर करण्यात आला आहे.

मतदान समाप्तीकरीता निर्धारित वेळेच्या आधी 48 तास (दि.5) मे रोजी सायंकाळी 17.00 वाजल्यापासून, मतदानाच्या पुर्वीचा (दि.6) मे रोजी संपुर्ण दिवस आणि मतदानाचा दिवस म्हणजे (दि.7) मे रोजी संपूर्ण दिवस प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण, अलिबाग, श्रोवर्धन व महाड या विधानसभा मतदार संघात मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

लोकसभा निवडणुका 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार रायगड मतदार संघात (दि.7) मे रोजी मतदान होणार आहे. तसेच मावळ मतदार संघात (दि.13) मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार सर्वत्र मतमोजणी (दि.4) जून रोजी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत या कालावधीत मद्यविक्रीस मनाई करून कोरडा दिवस ठेवणेबाबत आदेश जारी केले आहेत. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये मतदान समाप्तीकरीता निर्धारित वेळेच्या आधी 48 तास (दि.11) मे रोजी सायंकाळी 17.00 वाजल्यापासून, मतदानाच्या पूर्वीचा (दि.12) मे रोजी संपूर्ण दिवस आणि मतदानाचा दिवस (दि.13) मे रोजी संपूर्ण दिवस प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत मावळ लोकसभा मतदार संघात मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येईल.

Exit mobile version