प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक

जेएसडब्लू प्रशासनाविरोधात उपोषणाचे हत्यार

| अलिबाग | प्रतिनिधी |

पिकत्या जमीनी देऊनही कंपनी प्रशासनाकडून सुविधा व रोजगार देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे साळाव येथील प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भुमिका घेत जेसडब्लू कंपनी, प्रशासन व सरकार विरोधात उपोषण सुरु केले आहे. आमच्या मागण्या पुर्ण करा अन्यथा आमच्या जमीनी परत करा, ही भुमिका घेऊन हा लढा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दि. 12 जूलै रोजी शेतकऱ्यांनी सुरु केला आहे.

मुरुड तालुक्यातील चेहेर, नवीन चेहेर, मिठेखार, निडी साळाव, वाघुळवाडी येथील शेतकरी भात पिकांसह अन्य पिकांची लागवड करून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असताना, रोजगार मिळेल या नावाखाली येथील शेतकऱ्यांच्या जमीनी 1989 साली कवडीमोल भावाने विकत घेतल्या. साळाव या ठिकाणी सुरुवातीला विक्रम इस्पात नावाचा प्रकल्प सुरु झाला. त्यानंतर हा प्रकल्प वेलस्पन मॅक्सस्टील लिमिटेडने हा प्रकल्प घेतला.

गेल्या काही वर्षापासून वेलस्पन कंपनीकडून जेएसडब्लू कंपनीने ही जागा अधिग्रहित केली. पिकत्या जमीनी रोजगार मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी दिल्या. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी देणार, नोकरी न दिल्यास दर महिन्याला भत्ता देणार, गावांमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करणार असा सामजंस्य करार वेलस्पन मॅक्सस्टील कंपनी प्रशासन, जमीन मालक व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यामध्ये झाला. परंतू या कराराचे उल्लंघन आजतागातायत कंपनी प्रशासनाकडून करण्यात आले. याबाबत वारंवार कंपनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांच्याकडून वेळकाढूपणा करण्यात आला.

जेएसडब्लू कंपनीने एका टप्प्यात 16 लाख रुपये भरपाई देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन भुमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा आमच्या जमीनी परत करा. या भुमिकेतून लढा सुरु केला आहे, असे ॲड. विनायक शेडगे यांनी सांगितले. जेएसडब्लू कंपनी, प्रशासन व सरकार विरोधात उपोषण सुरु केल्याचे सांगण्यात आले आहे.200 हून अधिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला आहे. संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई सुरु केली आहे. यामध्ये जगदिश रोटकर, मंगेश गायकर, संतोष सुतार, जितेंद्र गायकर, राम सुतार, संदेश चवरकर, नागु माळी आदी प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत. याबाबत जेएसडब्लू कंपनी प्रशासनाचे बळवंत जोग यांच्याशी संपर्क साधाल, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version