| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
साळाव येथील वेलस्पन मॅक्सटील प्रा. लि. हा प्रकल्प उभारणीसाठी चेहेर व मिठेखार येथील शेतकर्यांच्या सुमारे 750 एकर जमीनी कवडीमोल भावाने जमीनी संपादीत करण्यात आल्या. मात्र आजही येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी रोजगारासाठी वणवण करीत आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी आता आक्रमक भुमिका घेत वेगवेगळ्या मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबत पावले उचलली जातील असा इशारा शेतकर्यांच्यावतीने अजय चवरकर यांनी दिला आहे.
मुरुड तालुक्यातील चेहेर व मिठेखार येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी असून 2009 मध्ये प्रकल्प निर्माण करण्यासाटी पिकत्या जमीनी कमी किंमतीमध्ये प्रशासनाने घेतल्या.फक्त अडीचशे ते तीनशे एकर जमीनीचा प्रकल्पासाठी वापर करण्यात आली. अन्य जमीन आजही पडून आहे. आजतागायत 12 वर्ष होऊनदेखील संपादीत केलेली जमीन वापरात नाही. त्या जमीनीच्या बदलत्यात बाधीत शेतकर्यांना व त्यांच्या कुटूंबियांना कायम स्वरुपी नोकरीची लेखी हमी दिली होती. तसेच मानधन व वाढीव रक्कम देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्या आश्वासनाची कोणतीही पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शंभरहून अधिक शेतकर्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे.
सामंजस्य कराराप्रमाणे बाजारभावाप्रमाणे पुर्ण मानधन देण्यात यावा. सुरुवातीला झालेला शेतकर्यांचा व्यवहार व आता आता होणारा व्यवहार यातील रकमेची तफावत वाढीव रकमेच्या स्वरुपात मिळावी. 1989 मध्ये सिकॉम कंपनीने शेतकर्यांच्या जमीनी खरेदी केल्या होत्या. परंतू प्रत्यक्षा नोकर भरतीत सामावून न घेतलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना चालु बाजारभावाप्रमाणे योग्य तो मोबदला द्यावा. नोकरी मागण्यास गेलेल्या स्थानिक शेतकर्यांवर पोलीस ठाण्यात कंपनी प्रशासनाकडून खोटे गुन्हे नोंदवून नाहक त्रास गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कंपनी प्रशासनाने थांबवावे अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात आली आहे.