नवीन शेवा, डोंगरी, पाणजे, फुंडे ग्रामस्थ नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
| उरण | वार्ताहर |
शेवा गावातील प्रकल्पग्रस्तांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शेवा गावच्या प्रकल्पगस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेवा गावचे नवीन शेवा येथे तात्पुरते पुनर्वसन झाले आहे. मात्र, परिपूर्ण तसेच योग्य असे पुनर्वसन झालेले नाही. शिवाय, कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई नवीन शेवा गावातील मासेमारी करणार्या भूमीपुत्रांना मिळालेला नाही. अशाच प्रकारची समस्या उरण तालुक्यातील समुद्र किनार्याला लागून असलेल्या डोंगरी, पाणजे, फुंडे या गावाच्या बाबतीत झाली आहे. अनेक आश्वासने या गावच्या ग्रामस्थांना देण्यात आली. मात्र, या गावांचा विकास अजूनही झालेला नाही.
राज्य शासनाने 12 फेब्रुवारी 1970 च्या अधीसुचनेनुसार सन 1983 साली न्हावा शेवा बंदरच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील 12 गावच्या हद्दीतील 2933 हेक्टर जमीन (गावठाण वगळून) संपादित केली. पैकी नुसत्या नवीन शेवा गावची 749 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. तसेच शेवा क्षेत्रातील खाजन क्षेत्राचे निवाडे होऊन जमीन जेएनपीटी (जेएनपीए) प्रशासनाने ताब्यात घेतले. मूळ शेवा गावात एकूण 364 घरे व 710 कुटुंबं होती. पुनर्वसनची संपूर्ण जबाबदारी शासनाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवली. तत्कालिन जिल्हाधिकारी संजय नारायण यांनी मात्र प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमीपुत्रांना खोटी आश्वासने देऊन फसविले. सर्वच सेवा सुविधांपासून या प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमीपुत्रांना वंचित ठेवले.
जेएनपीटी (जेएनपीए) प्रशासनाने विविध प्रकल्प डोंगरी ग्रामपंचायत व पाणजे तसेच फुंडे ग्रामपंचायतच्या मासेमारी हद्दीत आणल्याने विविध प्रदूषण होऊन व नैसर्गिक नाले, खाडी, वृक्ष, कांदळवने, वृक्ष नष्ट झाल्याने समुद्रातील मासेमारी नष्ट झाली. शेतीही पिकत नाही आणि मासेमारीही नाही, अशा संकटात सापडलेल्या पाणजे व डोंगरी, फुंडे ग्रामस्थांवर, मासेमारी करणार्या भूमीपुत्रांवर उपासमारीची वेळ आली आहे. जेएनपीए प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने त्यांना कोणतेही आर्थिक नुकसानभरपाई दिलेली नाही. त्यामुळे नवीन शेवा गावातील मासेमारी करणार्या भूमीपुत्राप्रमाणेच डोंगरी गावातील व पाणजे गावातील, फुंडे गावातील मासेमारी करणार्या भूमीपुत्रांनी आपल्याला आर्थिक नुकसानभरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, जेएनपीटी प्रशासन यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला, पण नुकसानभरपाई मिळाली नाही. यासाठी नवीन शेवा गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत यांनी आपली समस्या संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष योगेश म्हात्रे यांच्या कानावर टाकली. लगेचच योगेश म्हात्रे यांनीही ही समस्या भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निर्गुण कवळे यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली. तदनंतर नवीन शेवा, डोंगरी, पाणजे, फुंडे येथील सर्व मासेमारी करणारे भूमीपुत्र निर्गुण कवळे यांची भेट घेणार होते. मात्र निर्गुण कवळे यांनी स्वतः आई शांतेश्वरी मंदिर नवीन शेवा उरण येथे बैठक लावण्याचे सांगून मी स्वतः तिथे येईन व मासेमारी करणार्या भूमीपुत्रांचे समस्या एकूण ते सोडविण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. त्यानुसार दि. 22/2/2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता आई शांतेश्वरी मंदिर, नवीन शेवा, उरण येथे नवीन शेवा, पाणजे, डोंगरी, फुंडे गावातील मासेमारी करणार्या स्थानिक भूमीपुत्रांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवीन शेवा, पाणजे, डोंगरी, फुंडे गावच्या ग्रामस्थांनी, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली व्यथा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे राज्य अध्यक्ष निर्गुण कवळे यांच्यसमोर मांडली.