| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील नागरिकांसाठी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वाचनालय, ग्रंथालय सुरू केली आहेत. मात्र असे असताना, वाशीसारख्या शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं वाचनालय करोना काळापासून बंद आहे. हे बंद असलेले वाचनालय सुरू करण्यासाठी मागच्या तीन वर्षांपासून पालिका प्रयत्नशील आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेला अजूनही यश आलेले नाहीये. त्यामुळे या वाचनालयात अभ्यासासाठी येणार्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. लवकरात लवकर हे वाचनालय खुले करावे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
नवी मुंबईतील वाशीमध्ये महापालिकेच्यावतीने वाशी डेपोच्या मागील उद्यानात या वाचनालयाचे उभारणी केली आहे. 7 मार्च 2006 रोजी या वाचनालयाचे उद्घाटन तत्कालीन महापौर मनीषा भोईर यांच्या हस्ते करण्यात आले होते. वाचनालय आणि सांस्कृतिक भवन अशी ही इमारत उभारली असली तरी संपूर्ण इमारतीमधून वाचनालय चालवले जात होते. शाहू महाराज वाचनालय या संस्थेला हे वाचनालय पालिकेच्या वतीने चालवण्यासाठी देण्यात आले होते. करोना काळापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने हे वाचनालय सुरू होते. या वाचनालयात दैनंदिन वृत्तपत्रांबरोबरच अनेक वैचारिक पुस्तके कादंबरी, व्यक्ती चरित्र, ललित साहित्य, बाल साहित्य अशी विपुल साहित्य संपदा होती. विशेष म्हणजे, हे वाचनालय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हक्काची जागा झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील विद्यार्थी या वाचनालय अभ्यास करण्यासाठी येत होते. यामध्ये एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासाठी हे वाचनालय सोयीस्कर झाले होते.
मात्र, करोना काळात हे वाचनालय बंद पडले. त्यानंतर महापालिकेने हे वाचनालय स्वतः चालवणार असे ठरवले. मात्र, महापालिकेला हे वाचनालय काही केल्या सुरू करता आले नाही. पालिकेने या संस्थेकडून वाचनालय काढून घेतले. त्यानंतर वाचनालयाची इमारत बंद करण्यात आली. करोना काळात बंद झालेली वाचनालयाची ही इमारत आजपर्यंत बंदच आहे. आता ही ही इमारत धूळ खात उभी आहे. इमारतीच्या आत असलेले फर्निचर अस्तव्यस्त पडले आहे. मात्र, हे वाचनालय बंद झाले म्हणून सर्वात जास्त नुकसान हे परिसरातील विद्यार्थ्यांचे झाले आहे आहे. वाशी सेक्टर 10 हा परिसर मध्यमवर्गीयांचा परिसर म्हणून ही ओळखला जातो. सर्वांनाच घरात अभ्यास करणे शक्य होत नाही त्यांना या वाचनालयात शांत वातावरणात अभ्यास करता येत होता. यासंदर्भात महापालिका समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पालांडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.