| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोर्हे यांनी 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केला होता. यावर सोमवारी (दि. 24) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केले. नीलम गोर्हे चारवेळा आमदार कशा झाल्या हे सर्वांना माहीत आहे, अनेक पक्षांचा अनुभव घेतलेल्या नीलम गोर्हेंनी केलेले भाष्य मूर्खपणाचे असून, असे विधान करायला नको होते, असा टोला त्यांनी लगावला.
नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे विधान अनेक पक्षांचा अनुभव घेतलेल्या गोर्हेंनी असे विधान करायला नको होते. नीलम गोर्हे चारवेळा आमदार कशा झाल्या हे सर्वांना माहीत आहे. नीलम गोर्हे यांच्याबाबत संजय राऊत जे बोलले, ते 100 टक्के योग्य होते. ते नेहमीच योग्यच बोलतात. मी स्वागताध्यक्ष असल्याने राऊतांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल, असेही शरद पवार म्हणाले. साहित्य संमेलन राजकारण्यांनी हायजॅक केले हा आरोप मला मान्य नाही, असे सांगत दिल्लीतील साहित्य संमेलनात देशभरातून गर्दी झाली. साहित्य संमेलन म्हटलं की वाद हे आलेच, असेही पवार म्हणाले.