रायगडकरांची घोर निराशा, कूर्मगतीच्या कामाचा फटका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामांचे अनेकवेळा भूमीपूजन झाले. प्रत्यक्षात मात्र हे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. साळाव-तळेखार रस्तादेखी अपूर्ण स्थितीत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु होऊन 15 वर्षाहून अधिक पूर्ण झाले आहे. या रखडलेल्या महामार्गाच्या कामासाठी वेगवेगळ्या संस्था, संघटनांबरोबरच पत्रकारांनीदेखील आवाज उठविला. अनेकवेळा आंदोलने, मोर्चे काढले, निवेदन देऊन महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र आजही चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यास संबंधित विभाग उदासीन ठरत आहेत. या संथगतीने सुरु असलेल्या कामांमुळे पर्यटकांसह नागरिक व जिल्ह्यातील स्थानिक त्रस्त झाले आहेत. यावर्षात जिल्ह्यातील या रस्त्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु या वर्षात काम पूर्ण करण्यास ही यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे नव्या वर्षातदेखील मुंबई-गोवा महामार्गासह अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवास खडतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गुरचरण जागेमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय उभारण्यासाठी मागील चार वर्षापूर्वी भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणारअसा प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यावधी रुपयांचे असणारे प्रकल्प कधी होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
अलिबाग तालुक्यातील विद्यानगर येथील मुकबधीर विद्यालयाच्या जून्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी 15 ऑगस्ट 2021 मध्ये भूमीपूजन सोहळा पार पडला होता. एक वर्षात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु मुकबधीर विद्यालयाचे काम कुर्म गतीने सुरु आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. भाडे तत्वावर घेतलेल्या जागेत मुलांना शिकविण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. 31 गुंठे क्षेत्रात असलेल्या या जागेत एक मजली इमारत बांधली जाणार आहे. आठ वर्ग खोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थाने, अधीक्षकांसाठी कार्यालय व निवासस्थान, वैद्यकीय कक्ष, श्रवण चाचणी खोली, अंतर्गत खेळाची खोली, सुस्सज असे सभागृह, गार्डन, क्रिडांगण, व्यवसायिक प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असणार आहेत. तीन वर्षे होऊनही हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. अलिबाग तालुक्यातील किहीम या ठिकाणी पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांच्या नावाचे अभ्यास केंद्र व संशोधन केंद्र उभारण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षापासून हे प्रकल्प अपूर्ण स्थितीत आहे. जिल्ह्यातील तालुक्यामधील क्रिडा संकुलच्या कामांना निधी अभावी ब्रेक लागला आहे. सुसज्ज असे मैदान, दोनशे मीटर धावण्याचे ट्रॅक, संरक्षीत भिंत, कबड्डी, खो-खोखो, कुस्तीसाठी इनडोअर मल्टीपर्पज हॉल,अद्ययावत अशी व्यायामशाळांची कामे रखडली आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी पाच हजार 500 किलो मीटर असून जिल्ह्यातील दोन हजारहून अधिक किलो मीटरचे रस्ते खराब झाले आहेत. अतिवृष्टीमुळे हे रस्ते खराब झाल्याची माहीती समोर येत आहे. गावांपर्यंत जाण्यासाठी खड्डेमय रस्ते असल्याने प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु निधीअभावी ही कामे रखडली आहेत. रायगड जिल्हा परिषदेची जूनी इमारत जीर्ण झाल्याने कुंटेबाग येथे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले. जून्या इमारतीच्याजागी नवीन इमारत बांधण्यासाठी प्रशासनाकडून हालचाल सुरू झाली. त्यासाठी 108 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मंजूरीदेखील मिळाली आहे. विधानसभा निवडणूकी पुर्वी मंजूरी मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली नाही.
