अपंग, ज्येष्ठ नागरिकाची तक्रार
| पेण | प्रतिनिधी |
पेण तहसील कार्यालयाच्या परिसरात दलालांचा सुळसुळाट वाढला असून, सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने मुख्यमंत्री तसेच तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.
पेण तालुक्यातील कासू गावचे रहिवासी ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण परशुराम तांडेल हे अपंग असून, एका डोळ्याने दृष्टीहीन आहेत. तरी देखील पेण येथील तहसील कार्यालयात उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेले होते. त्यांनी सर्व कागदांची पूर्तता केली. ते जमा केले. त्यावेळेला त्यांच्याकडून 150 रुपये फी आकारण्यात आली. मात्र, त्यांना पावती मिळाली नाही. दुसर्या दिवशी चौकशीला गेले असता त्यांनी पावती मिळावी, अशी मागणी केली. मात्र, सेतू कार्यालयात असलेल्या मुलींनी त्यांच्याबरोबर हुज्जत घातली आणि 50 रुपये त्यांना परत दिले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण तांडेल यांनी उरलेल्या 100 रुपयांची रितसर पावती मागितली. परंतु, ती देखील पावती सेतू कार्यालयातून देण्यात आली नाही. त्यावर सेतू कार्यालयाचे कर्मचारी व तांडेल यांच्यामध्ये तू-तू, मै-मै झाली. अखेर तांडेल यांनी नायब तहसीलदार नितीन परदेशी यांचा दरवाजा ठोठावला.
नायब तहसीलदारांनी योग्य ती चौकशी करून प्रतिज्ञापत्रासाठी 35 रुपयेच घ्यायचे असतात असे सांगितले व सेतू चालवणार्या व्यक्तींना बोलावून योग्य ती तंबी दिली. याच कार्यालयाबाहेर व्हेंडर जे स्टॅम्प पेपर विकतात, ते प्रत्येक स्टॅम्पमागे 50 रूपये जास्तीचे घेतात, असाही अनुभव आहे, असे तांडेल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
माझ्यासारख्या अपंग ज्येष्ठ नागरिकाशी सेतू कार्यालयातील कर्मचार्यांनी अरेरावी केली. 35 रूपयांऐवजी 150 रूपये प्रतिज्ञापत्राचे घेतले. तसेच 100 रुपयांच्या स्टॅमचे 150 रूपये घेतले. ही सरळ-सरळ लूट चालू आहे. या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे गरजेचे आहे. म्हणून मी पुढाकार घेतला आहे.
लक्ष्मण तांडेल
तक्रादार
सेतू कार्यालय जास्तीचे पैसे आकारल्याची तक्रार लक्ष्मण तांडेल यांनी केली असून, त्याची शहानिशा केली आहे व ठेकेदाराला त्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रांसंदर्भात दरफलक लावण्याचे आदेश दिले आहेत.
नितीन परदेशी
नायब तहसीलदार