मालमत्ताधारकाची सांकेतिक क्रमांकाने होणार नोंद

ही यंत्रणा राबविणारी पनवेल राज्यातील दुसरी महापालिका


| पनवेल | वार्ताहर |

मालमत्ता खरेदी-विक्री करतेवेळी सहाय्यक निबंधक पनवेल यांच्याकडे नोंद करताना पनवेल महानगरपालिका कर देयकावरील मालमत्ता सांकेतिक क्रमांक (आपल्या दस्तामध्ये) नोंद करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या क्रमांकाद्वारे खरेदीदाराची स्वयंचलित पध्दतीने करदाता म्हणून नोंदणी होणार आहे. ही सुविधा राबविणारी मुंबईनंतर पनवेल महानगरपालिका ही दुसरी महानगरपालिका असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील सहाय्यक दुय्यम निबंधक पनवेल ए.पी. चौधरी, सहाय्यक दुय्यम निबंधक पनवेल एम.पी.लोद, मालमत्ता विभाग उपायुक्त गणेश शेटे, अभियंता नागनाथ डिगोळे यांची मुख्यालयात बैठक झाली. यावेळी स्वयंचलित पध्दतीने नोंदणी करताना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना यावरती चर्चा करण्यात आली.

व्यवसायपूरकता या उपक्रमांतर्गत नागरी स्वराज्य संस्थामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा एकत्मिक स्वरूपात देण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधा अधिक पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ही नवीन सुविधा सुरू करण्यात येत आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी-विक्री झाल्यानंतर त्या मालमत्तेची करदाता अभिलेख यांवरती नोंद केली जाते. महापालिका देणार असलेल्या या नवीन सुविधेंतर्गत महापालिका हद्दीतील मालमत्ता खरेदी-विक्री करतेवेळी सहाय्यक निबंधक पनवेल यांच्याकडे नोंद करताना महानगरपालिकेच्या कर देयकावरील मालमत्ता सांकेतिक क्रमांक आपल्या दस्तामध्ये नोंद करणे आवश्यक असणार आहे. तसेच मालमत्ताधारकांनी मालमत्ता खरेदी करताना मालमत्तेचा मालमत्ता कर थकबाकीसह पूर्ण भरणा केलेबाबत खातरजमा करुन पावती आपल्या दस्तास जोडणे आवश्यक आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या नोंदणीदस्तामध्ये मालमत्ता सांकेतिक क्रमांक नमूद केल्यास आपले नाव महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीत तात्काळ दाखल होणार आहे. यामुळे खरेदीदाराला पालिकेकडे करदाता म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार नाही, तसेच मालमत्ताधारकांना आपले स्वत:चे कर देयक पालिकेच्या वेबसाईटवरती सहजरित्या उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

या नवीन सुविधेमध्ये पालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांनी मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी खरेदीदाराने मालमत्ता कर पूर्ण भरला आहे की नाही यांची खात्री करावी. तसेच खरदी-विक्री दस्तांमध्ये मालमत्ता सांकेतिक क्रमांक (यूपिक आयडी नंबर) नमूद करावा, जेणे करून दस्तांची नोंदणी झाल्यावर महापालिकेच्या सॉफ्टवेअरमध्ये खरेदीदाराच्या नावाचा तात्काळ समावेश होईल.

– गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

स्वयंचलित करदाता नोंदणी पध्दतीचे फायदे
करदाता नोंदणीच्या वेळेत बचत होऊन पेपरलेस काम होणार, मानवी चुका कमी होणार, शंभर टक्के अचूकपणे मालमत्ताधारकाच्या नावाचे समावेशन होते, नागरिकांना मालमत्तेवरील नाव बदलण्यासाठी महापालिकेत येण्याची गरज लागणार नाही, दस्ताऐवजांमध्ये मानवी हस्तक्षेप राहणार नाही, जलद लोकाभिमुख पारदर्शक पध्दतीने कारभार होणार.

Exit mobile version