मालमत्ता करवाढीला स्थगिती

नगरपंचायतीचा जनहिताचा निर्णय; जनतेतून समाधान व्यक्त

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मागील अनेक दिवसांपासून अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतने केलेल्या मालमत्ता करवाढीविरोधात नागरिकांनी आंदोलन व निवेदन देऊन लोकचळवळ उभी केली होती. या अनुषंगाने पाली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नुकतीच नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. यासभेत नगरपंचायतने लोकभावना लक्षात घेऊन सर्वानुमते सन 2025-26 साठी केलेली करावाढ अखेर स्थगित केली आहे.

मागील काही दिवसांपासून पाली नगरपंचायतने मालमत्ता करवाढीची घोषणा केली होती. त्यावर पालीकरांनी या करवाढीविरोधात नागरिकांनी आंदोलन छेडले होते. त्यांनी याबाबत नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन लोकचळवळ उभी केली होती. या अनुषंगाने पाली नगरपंचायतने नुकतेच सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले हेते. या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, मुख्याधिकारी माधुरी मडके, सर्व नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची चर्चा करवाढीच्या प्रस्तावावर केंद्रित होती. यावेळी नगरपंचायतने लोकभावना व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सन 2025-26 साठी केलेली करावाढ अखेर स्थगित केली आहे. या निर्णयामुळे पालीकरांना दिलासा मिळणार असून, नगरपंचायतीने जनतेच्या हिताचा विचार करून पुढाकार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे पाली शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जनतेच्या बाजूने ठामपणे उभे
नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत बोलताना नगराध्यक्ष पराग मेहता यांनी सांगितले की, यापूर्वी 30 डिसेंबर 2024 रोजी तत्कालीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी करवाढ रद्द करण्याचा ठराव घेतला होता. मात्र, प्रशासनाने या ठरावावर अपील केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी झाली आणि 25 मार्च रोजी करवाढी संदर्भात नगरपंचायतीने केलेला ठराव जिल्हा अधिकारी अलिबाग यांनी रद्द केल्यामुळे नाईलाजाने नगरपंचायतला कारवाढ तशीच ठेवावी लागली होती. त्यानंतर आता नगरपंचायतीने पालीकरांच्या हितासाठी पुन्हा एकदा करवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. तसेच, पाली नगरपंचायतीतील सर्व नगरसेवक हे जनतेच्या बाजूने ठामपणे उभे आहेत आणि त्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेत आहेत, असेही मेहता यांनी सांगितले.

पालीकरांना मालमत्ता करवाढीपासून तूर्तास दिलासा मिळणार आहे. पाली-सुधागड संघर्ष संस्था व पालीमधील सुजाण नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. नगर पंचायत नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष, नगरसेवकांनी मालमत्ता करवाढ करण्यास तूर्तास एक वर्ष स्थगिती दिली आहे. हा लढा असाच सुरु राहील. आधी विकास मग करवाढ, ही मागणी ठाम आहे. नागरिकांनी दिलेला पाठिंबा आणि केलेले उत्स्फूर्त आंदोलन या मुळेच हे शक्य झाले आहे. पाली सुधागड संघर्ष संस्था आणि सुजाण नागरिक यांचे आभार.

– कपिल पाटील, नागरिक, पाली

Exit mobile version