नगरपंचायतीचे दुर्लक्ष; लहानग्यांचा हिरमोड
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
तीन वर्षापूर्वी पालीत बांधण्यात आलेल्या एकमेव बालोद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत हे बालोद्यान अखेरची घटका मोजत असल्याने अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन पाली ग्रामपंचायतीमार्फत लहान मुलांची गरज ओळखून येथील राम आळीमध्ये पालीतील एकमेव बालोद्यान बनविण्यात आले होते. त्यानंतर पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नगरपंचायतीवर प्रसासकांची नेमणूक झाली. दरम्यानच्या काळात उद्यानाकडे दुर्लक्ष झाले. मात्र, नगरपंचायत होऊन अडीच ते तीन वर्षे झाली असुन वारंवार नगरपंचायतीकडे या बाल उद्यानाबाबत दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी तक्रार करण्यात आली. मात्र, नगरपंचायतीकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
पाली नगरपंचायत झाल्यावर पालीकऱांना वाटले की, यावेळी या बलोद्यानाला नवी झळाळी येईल. मात्र, हे बालोद्यान जैसे थेच आहे. येथील पाळणे, सी-सॉ, गेट व बाकडे तुटली आहेत. तारेचे कुंपण अनेक ठिकाणी मोडले आहे. त्यामुळे येथे गुरांचे वास्तव्य असते. येथील झाडे व गवत कोमेजून गेली आहेत. फरशांची दुरावस्था झाली आहे. आजूबाजूला वाहने पार्क केलेली असतात. परिणामी लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण नसल्याने त्यांचा प्रचंड हिरमोड होत आहे.
संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन ग्रामपंचायतीने मिळून केलेल्या उद्यानाकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा नाही. नगरपंचायतने उद्यानाची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करावी. याबाबत अनेक वेळा नगरपंचायतीकडे तक्रार देऊन देखील नगरपंचायत अध्यापिक कोणता उपयोजना केलेल्या नाहीत. काही दिवसांनी हे उद्यान नाहीसे होईल. तसेच, त्या जागेवर अतिक्रमण होण्याची वाट नगरपंचायत पाहते का?
अमित निंबाळकर,
माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली