| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर सेक्टर-12 येथील एका ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल 1 कोटी 64 लाख 34 हजार 976 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये हिरे, सोन्याचे आणि प्लॅटिनमचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर-12 मधील सीआयएसएफ रोडवरील उत्सव चौक परिसरातील साई कृपा प्रिमायसेस इमारतीत कॅन्डीअर लाईफस्टाईल ज्वेलर्स हे दुकान आहे. 10 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले होते. मंगळवारी (दि.11) सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर हत्याराच्या साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकानातील 68 लाख 91 हजार 779 रुपये किमतीचे हिऱ्यांचे 139 दागिने, 15 लाख 57 हजार 379 रुपये किमतीचे सोन्याचे 27 दागिने, 79 लाख 55 हजार 817 रुपये किमतीचे प्लॅटिनमचे 48 दागिने तसेच कॅश काउंटरमधील 30 हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 कोटी 64 लाख 34 हजार 976 रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
खारघरमध्ये कोट्यवधींचा ऐवज लंपास
