। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण 11 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांचा हा धुमाकूळ सोमवारी (दि.31) रात्रीच्या सुमारास सुरू होता. याप्रकरणी नरेश पंढरीनाथ पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार उरण पोलीस कारवाई करीत आहेत.
उरण तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्या संदर्भात उरण पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, त्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यातच पाणदिवे गावातील नरेश पंढरीनाथ पाटील हे सोमवारी कोप्रोली येथे गेले होते. रात्री 11 वाजताच्या सुमारास पुन्हा आपल्या घरी आले असता, त्यांच्या बंद घरातील दरवाजा उघडा दिसला. त्याचबरोबर घरातील सामान देखील अस्थाव्यस्थ पडलेले होते. घरातील कपाट उघडून कपाटातील सामान विखुरलेल्या अवस्थेत पडले होते. अधिक पाहणी केली असता कपाटातील 1लाखाची रोकड व 10 लाख किंमतीचे मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती उरण पोलिसांना देण्यात आली. या चोरी संदर्भात उरण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.