रायगडातील माता, बालकांना सुरक्षा कवच

‌‘मिशन इंद्रधनुष्य’अंतर्गत 6455 लाभार्थ्यांचे लसीकरण

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मिशन इंद्रधनुष्य 5.0 अंतर्गत झालेल्या लसीकरण मोहिमेची पहिली फेरी शंभर टक्के यशस्वी झाली आहे. या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबिरांमधून, तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आल्याने विविध आजारांपासून संरक्षण मिळणार आहे. या मोहिमेत 0 ते 5 वर्षांमधील 6185 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या ‌‘मिशन इंद्रधनुष्य 5.0′ मोहीम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. या मोहिमेंतर्गत मिशन इंद्रधनुष्य मोहीम, अतिसार नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय जंतुनाशक कार्यक्रम जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात राबवण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले होते.

‌‘मिशन इंद्रधनुष्य 5.0′ अंतर्गत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमधून जिल्ह्यात 715 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. 0 ते एक वर्षामधील 3 हजार 817, एक ते दोन वर्षामधील एक हजार 236, दोन ते पाच वर्षाखालील एक हजार 132 बालके तसेच 270 गर्भवतींचे लसीकरण करण्यात आले आहे.

डॉ. मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी, राजिप
Exit mobile version