संरक्षण भिंतींनाच संरक्षणाची गरज

। पालघर । प्रतिनिधी ।

मोखाडा-खोडाळा या मुख्य रस्त्यावरील जोगलवाडी बसस्थानकाच्या नजीक रस्त्यालगत असलेल्या संरक्षण भिंतीचा 5 ते 6 मीटर लांबीचा भाग पहिल्याच पावसाळयात जमीनदोस्त झाला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामांची चांगलीच पोलखोल झाली असून रस्त्याच्या संरक्षणासाठी उभारलेल्या जाणार्‍या संरक्षण भिंतींनाच आता ‘संरक्षणाची’ गरज असल्याचे बोलले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग विकास कामांच्या नावाखाली दरवर्षीच लाखो रुपयांचा खर्च करून संरक्षण भिंतीची कामे करतो. परंतु, बांधल्या जाणार्‍या संरक्षण भिंती निकृष्ट असतात. यामध्ये मोठ्या दगडांचा वापर करून संरक्षण भिंती उभारल्या जातात आणि ठेकेदार याच कामांना अधिकपणे प्राधान्य देत असतात. परंतु, हि विकास कामे पहिल्याच पावसाळयात तग धरत नसतील तर हे कोणत्या विकासाचे द्योतक आहे? अशा बोगस कामांना कुणाच्या मर्जीने मोकळीक दिली जाते? लाखो रुपयांचा खर्च होत असताना या कामांचे मूल्यमापन केले जाते की नाही? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मानकर यांना विचारले असता, ही कोसळलेली संरक्षण भिंत तात्काळ ठेकेदाराकडून नव्याने बांधून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version