पावसाळ्यापूर्वी घरांना ताडपत्रीचे कवच

| रेवदंडा | प्रतिनिधी |

मान्सून वेळेत दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात पावसाळी पूर्वतयारीला वेग आला आहे. घरगळती, भिंतींमध्ये झिरपणारी ओल आणि घरातील साहित्याचे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांकडून घरांवर ताडपत्री टाकण्याची लगबग सुरू झाली आहे. परिणामी प्लास्टिक ताडपत्री विक्रेते, हार्डवेअर दुकानदार आणि संबंधित व्यवसायांना चांगलीच चालना मिळाली आहे.

अलिबाग, मुरूड, रोहा, पेण, पनवेल इत्यादी तालुक्यांतील किनारपट्टी व ग्रामीण भागात कौलारू घरे, पत्र्यांची घरे, गोठे तसेच शेती साहित्य झाकण्यासाठी ताडपत्रीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्थानिक विक्रेत्यांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात ताडपत्रीच्या विक्रीत सुमारे 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात 68, 912 आणि 1215 फूट आकारांच्या ताडपत्रींना सर्वाधिक मागणी असून, 90 ते 200 दर्जाच्या ताडपत्री 300 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. निळ्या रंगाच्या सिलपॉलिन ताडपत्रींना ग्राहकांकडून विशेष पसंती दिली जात आहे. हार्डवेअर दुकाने, आठवडी बाजार तसेच रस्त्यांच्या कडेला ताडपत्री विक्रीचे स्टॉल उभे राहू लागले आहेत. ताडपत्रीसोबत बांबू, सुतळी, खिळे आणि दोरखंड यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. काही विक्रेत्यांनी थेट घरांवर ताडपत्री बांधून देण्याची सेवा सुरू केली असून त्यासाठी 200 ते 500 रुपये मजुरी आकारली जात आहे.

Exit mobile version