नवीन पोसरीत संरक्षक भिंत वादाच्या भोवऱ्यात

| रसायनी | वार्ताहर |

मोहोपाडा नवीन पोसरी येथे अनेक दिवसांपासून चालत असलेल्या जमिनीच्या वादाला आता वेगळे वळण लागल्याचे दिसून आले आहे. नवीन पोसरी गावातील 231/36 क्र. चा सात-बारा हा रघुनाथ शंकर पाटील यांच्या मालकीचा आहे. सदर जागा 1.65 गुंठ्याचा प्लॉट असून, 1200 स्क्वेअर फूटमध्ये त्यांच्या घराचे बांधकाम करण्यात आले आहे. तर, उर्वरित जागा त्यांनी त्यांच्या वापरासाठी मोकळी ठेवली होती. मात्र, घरामागील रहिवाशांनी त्या जागेला वहिवाटीचे स्वरूप दिले असल्याचे रघुनाथ पाटील यांच्या मुलांनी सांगितले.

2009 साली या घराचे बांधकाम आम्ही केले, त्यावेळी आमच्या येण्या-जाण्याची सोय व्हावी आणि शेजारधर्म पाळता यावा यासाठी ही जागा मोकळी ठेवली होती, त्यावेळी मागील रहिवासीसुद्धा येथून ये-जा करू लागले होते. मात्र, कालांतराने येता-जाता ते लोक शिवीगाळ करत असल्यामुळे आमचा मार्ग आम्ही बंद केला आहे, असे रघुनाथ पाटील यांच्या पत्नीने सांगितले. पाटील कुटुंबाने या जागेबाबत त्यांना न्याय मिळावा यासाठी तहसीलदार तसेच कर्जत येथील महसूल उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाद मागितली आहे. प्रशासन याबाबतीत काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version