| मुरुड जंजिरा | वार्ताहर
नुकतीच नांदगाव ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली असून, विजयी उमेदवारांचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते. परंतु, काही अज्ञात व्यक्तींकडून हे बॅनर फाडण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे नांदगाव येथील प्रमुख नेते महेश मापगावकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
निवडणूकपूर्वीचे व निवडणूक जिंकल्यानंतरचे हे बॅनर फाडून टाकल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून, याचा निषेधही व्यक्त केला आहे. याबाबत महेश मापगावकर यांनी सांगितले की, नांदगाव ग्रामपंचायतीमधील निवडणूक इंडिया आघाडीने एकतर्फी जिंकली आहे.
थेट सरपंच व उपसरपंचसुद्धा इंडिया आघाडीचा निवडून आला आहे.सर्वत्र विजयी जल्लोष सुरु असताना बॅनर कोणाला पसंत पडले नाही, त्याचे हे कृत्य आहे. याबाबत सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असल्याचे यावेळी मापगावकर यांनी सांगितले आहे.
