महिनाभरापासून नेटवर्क सेवा विस्कळीत; टॉवर असूनही दहा वर्ष समस्या कायम
| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील नऊ गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून बीएसएनएलची मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिकांना संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.29) म्हसळा येथील बीएसएनएल कार्यालयावर मोर्चा काढला.
कासारकोंड, धनगरमलई, नागलोली मधलीवाडी, नागलोली, नागलोली नवीवाडी, देवखोल, बोर्ला, बोर्ला रसाळवाडी आणि वावेपंचतन या गावांसाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला. मात्र, त्यानंतरही नेटवर्कची समस्या कायम असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यंत्रणेत वारंवार बिघाड होत असून, दुरुस्तीनंतर काही काळातच सेवा पुन्हा विस्कळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या नऊ गावांची लोकसंख्या 1600हून अधिक आहे. अनेक नागरिक रोजगारानिमित्त मुंबईसह इतर शहरांत राहतात. त्यामुळे कुटुंबीयांशी संपर्कासाठी मोबाईल सेवा आवश्यक आहे. मात्र, नेटवर्कअभावी फोन न लागणे आणि इंटरनेट सेवा बंद राहणे, अशा अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. सरकारी दूरसंचार सेवा असूनही गावांना नियमित नेटवर्क मिळत नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून सेवा शुल्क घेतले जाते, त्यामुळे सेवा सुरळीत देणे आवश्यक आहे, असे मुंबईस्थित नागलोली येथील रहिवासी सुनील रिकामे यांनी सांगितले. नेटवर्क नसल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो, असे स्थानिक रहिवासी जयेश जाधव यांनी सांगितले. दरम्यान, दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा बिघाड होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून लवकरच सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती बीएसएनएल कार्यालयातील अधिकारी तुषार चौधरी यांनी दिली.
आपत्कालीन परिस्थितीत अडचणी
नेटवर्क सेवा खंडित असल्याने आजारपण, अपघात किंवा अन्य आपत्कालीन प्रसंगी नातेवाईक, शेजारील गावांतील नागरिक किंवा मदत यंत्रणेशी संपर्क साधणे कठीण होते. दुर्गम भागातील दूरसंचार सेवा खंडित राहणे ही सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दहा वर्षांनंतरही समस्या कायम
दहा वर्षांपूर्वी टॉवर उभारल्यानंतरही नेटवर्कची समस्या कायम असल्याने देखभाल, तांत्रिक अडचणी आणि तक्रार निवारण यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. बीएसएनएल प्रशासन या नऊ गावांतील नेटवर्क समस्या कायमस्वरूपी सोडवणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.







