| वावोशी | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खोपोली उपविभागाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) वावोशी फाटा येथे सौरऊर्जा योजनांबाबत जनजागृती व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील वीजग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये 100 युनिटच्या आत वीज वापर असलेल्या ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (स्मार्ट) सोलर योजना तसेच अन्य शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. सौरऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया, शासनाकडून मिळणारे अनुदान, रूफटॉप सोलरचे फायदे, वीजबिलात होणारी बचत आणि सौरऊर्जेमुळे होणारे पर्यावरणीय फायदे याबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी इच्छुक ग्राहकांची सोलर रूफटॉप योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीही करण्यात आली. या शिबिरात वावोशी फाटा, शिरवली, जांभीवली, गारमाळ, गोरठण, आपटी, तळाशी, राणसई, दांडवाडी, नंदनपाडा आणि छत्तीशी विभागातील अनेक वीजग्राहकांनी सहभागी होत योजनांची माहिती घेतली. सौरऊर्जा योजनांमुळे वीजबिलात बचत होण्यास मदत होणार असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.
सौरऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यासह वीजबिलात मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वावोशी येथील कार्यालयाला भेट देऊन सौरऊर्जा योजनांची माहिती घ्यावी आणि या योजनांचा लाभ घ्यावा.
वाघमोडे
खोपोली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता







