| रसायनी | प्रतिनिधी |
सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या व्यापारी असो.ने सोमवारी (दि.24) मोहोपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर बाजारपेठ बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठींबा दर्शविला. मोहोपाडा, नवीन पोसरी बाजारपेठ व परिसरात दिवसा आणि रात्रीही वारंवार वीज खंडित होत असल्याने प्रामुख्याने व्यापारी, हॉस्पिटल आणि छोटे व्यावसायिकांना मनस्तापासह आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतप्त विज ग्राहकांनी अनेकदा मोहोपाडा वीजवितरण शाखेला वेळोवेळी वारंवार विद्युतपुरवठा खंडित होण्याबाबत आणि इतर तक्रारींबाबत अवगत केले होते. त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने निवेदनात सांगितल्याप्रमाणे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय, पत्रकार, नागरिक व सेवाभावी संघटनांचा पाठिंबा मिळाला. यावेळी महावितरण आवश्यक ती उपाययोजना तत्काळ सुरू करत आहे. प्रलंबित मेंटेनन्सची कामे आठ ते दहा दिवसांत करण्यात येतील. वीजपुरवठा सुरळीत व अखंडित राहावा, यासाठी तांत्रिक कामे सत्वर करण्यात येतील. संबंधित यंत्रणेवर सतत देखरेख ठेवून समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल. ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पनवेल (ग्रामीण) कार्यकारी अभियंता, व्ही.एम. शिंदे व पनवेल 2चे उपकार्यकारी अभियंता एम.बी. राख यांनी सांगितले.







