| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली-खोपोली राज्य महामार्गवरील धोकादायक व जीवघेण्या खड्ड्यात नागरिकांनी शनिवारी (दि.19) वृक्षारोपण आंदोलन करून आपला आक्रोश व्यक्त केला. याआधी प्रशासनाला याबाबत निवेदन दण्यात आले होते. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत शहरातील खड्डे बुजवले. परंतु, त्यांनी राज्यमार्गावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने हे तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी हातात विविध माहिती फलके घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. वृक्षारोपण आंदोलन करून देखील प्रशासनाला जाग आली नाही तर रास्ता रोखो करून आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
पाली सुधागड संघर्ष संस्था व नागरिकांनी पाली शहरातील व पाली-खोपोली राज्य महामार्गावरील खड्यांसंदर्भात अर्ज विनंती व आंदोलनाद्वारे प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. परंतु, अद्याप ही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. शहरासह पाली-खोपोली राज्य महामार्गावरील जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी न भरल्यास शनिवारी (दि.19) या सर्व खड्ड्यांत वृक्षारोपण आंदोलन केले जाईल याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पाली नगरपंचायतने लागलीच पालीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली. तसेच, मोठे खड्डे सिमेंट काँक्रिटद्वारे भरण्यात आले. मात्र, एमएसआरडीसीने पाली-खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे भरले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी येथे आंदोलन केले आहे. या आंदोलनादेखील फरक पडला नाही तर तीव्र आंदोलन छेडून रास्ता रोको करण्यात येईल, असे नागरिकांनी सांगितले आहे. या संदर्भात माहिती घेण्यासाठी कृषीवलच्या प्रतिनिधीने एमएसआरडीसीचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.







