ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जळगावमधील शिवरे येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या निषेधार्थ ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामसभांवर निषेध व्यक्त करीत मंगळवारी (दि.1) रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

जळगाव येथील आयोजित ग्रामसभेच्या दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी.एन. पाटील यांच्यावर अमानुष हल्ला झाला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर ग्रामपंचायत अधिकारी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला. ग्रामपंचायत अधिकारी यांनी मंगळवारी राज्यस्तरीय निषेध मोर्चाचे आयोजन केले. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा शाखा रायगडच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व ग्रामपंचायत अधिकारी एकवटले. त्यांनी कामकाज होत असताना होणाऱ्या समस्येचा पाढा वाचला. काही मंडळी सोशल मीडियामार्फत चुकीचे व्हीडीओ व्हायरल करतात.त्यामुळे ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतिमा मलीन होत आहे. ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, त्यांच्या संरक्षणाची आवश्यक ती उपाययोजना करणे, जळगावसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसह जास्तीच्या ग्रामसभा घेऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत अधिकारी यांनी केली आहे.

Exit mobile version